ग्रामीण भागातील उगवता तारा… क्षितिज मोहोड

0
15

खुशखबर….. येत्या १५ ऑगस्टला ‘येडा’ येतोय

सुरेश भदाडे

गोंदिया-चंदेरी दुनिया वा बॉलिवूड हे शब्द कानावर येताच आपल्या नजरेसमोर उभी ठाकतात ती मोठमोठ्या सेलिब्रिटी तारे आणि तारकांच्या प्रतिमा. रुपेरी पडद्यावरून सरकत जाणाऱ्या त्या प्रतिमा आपल्याला अलगद भुरट पाडून जातात. चित्रपट जगतात जे काही चालतयं त्याची साधी माहिती सुद्धा बऱ्याचदा ग्रामीण भागातील अनेकांना नसते. छबिगृहात चालणारे ते तीन तासाचे चित्रपट आणि त्याच्या भावनिक विश्वास रमणारे रसिक स्वतःला तेथील नायकाच्या वा नायिकेच्या भूमिकेत बघत आपल्या कल्पना विश्वात रममान होण्यापलिकडे फारसा काही विचार सुद्धा करीत नाही. खेड्यापाड्यात चित्रपट बघून आलेले युवक अनेकदा त्या चित्रपटातील संवादफेक वा गीतांच्या तालावर ठेका धरताना सहज दिसतात.
झाडीपट्टीत तसे कलेला फार महत्त्व आहे. झाडीबोलीतील कलामंचातूून सुद्धा बरीच कलावंत मंडळी घडली. नाट्यप्रयोग तर या भागात मोठ्या कुतूहलाचा विषय आहे. ढंढारी, तमाशे या प्रकाराची चांगली जाण या भागातील रसिकांना बऱ्यापैकी आहे. मात्र, चित्रपट म्हटले की, मोठमोठे कलावंत, निर्माते आणि दिग्दर्शक यांची कामे असून ते केवळ मुंबईच्या बड्या लोकांचे काम आहे, असाच काहीसा समज झाडीपट्टीत असल्याचे जाणवते.
गोंदिया जिल्हा म्हटले तर तसाही या चंदेरी दुनियेच्या मायावी प्रभावापासून फार लांब आहे. असे असताना देवरी सारख्या मागास आणि नक्षल भागातून चित्रपट कलावंत होणे किंवा चित्रपट काढणे म्हटले तर फार लांबची बाब समजली जाते. शिक्षणासह सोयीसुविधांचा अभाव असलेल्या देवरी सारख्या गावातून रुपेरी जगतात एका क्षितिज नामक ताऱ्याचा उदय झाला आहे. एका नव कलाकाराची बेरारटाईम्सने त्याची मुलाखत घेतली.
देवरी पासून उत्तरेला दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या लहानशा खेड्यात क्षितिजच जन्म झाला. गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेत असताना त्याला नृत्याची ओढ लागली. या नृत्यकलेवर तो जीवापासून प्रेम करू लागला. मनात जिद्द असली तर आपले स्वप्न सहज साकार करता येऊ शकतात, असे क्षितिज अभिमानाने सांगत होता.
अंगात असलेल्या कलागुणांना क्षितिजने कॅरिअरचे रूप देण्याचे ठरविले. यातून त्याने प्रारंभी नृत्यांचे धडे देण्यासाठी शिकवणी सुरू केली. हे करता करता पुढे आपण आपला स्वतःचा अल्बम करण्याची कल्पना त्याच्या मनात आली. या कल्पनेला मूर्तरुप देण्यासाठी त्यांनी ग्रामीण भागातील उत्कृष्ट कलाकारांचा शोध घेण्यास सुरवात केली. पुढे यातून क्षितिजने १४ फेब्रुवारी २०१७ मध्ये ‘यार मतलबी’ हा पहिला अल्बम प्रदर्शित केला. महत्त्वाचे म्हणजे या अल्बमचे चित्रीकरण हे देवरी तालुक्यातील प्रेक्षणीय अशा ढासगडावर करण्यात आले. त्यात त्याची सहकलाकार म्हणून मेघाकुमारी हिने भूमिका साकारली. यानंतर मे २०१७ मध्ये त्याचा ‘प्रेमऋतू’ हा दुसरा अल्बम प्रदर्शित झाला. या अल्बमचे चित्रीकरण शिरपूर बांध परिसर आणि रूप रिसॉर्टमध्ये करण्यात आले. यामध्ये सहकलाकाराची भूमिका रोशनी शेवाटकर हिने साकारली. ‘जिंदगी’ या तिसऱ्या अल्बमचे चित्रीकरणसुद्धा देवरीमध्ये करण्यात आले. हा अल्बम महाविद्यालयीन जीवनावर आधारित आहे. हे तीन ही अल्बम देवरी सारख्या छोट्याशा खेड्यात तयार करूनही त्यांना कमालीची मागणी असल्याचे क्षितिज सांगत होता.
या तीनही अल्बमच्या यशाने क्षितिजाला लघुपट करण्याची कल्पना आली. आणि या कल्पनेतून जन्म झाला तो ‘येडा’या लघुपटाच्या कथानकाचा. या लघुपटामध्ये तेजस्विनी खोब्रागडे, भूमाला कुंभरे, गोपी रणदिवे आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. ग्रामीण भागातील अंधश्रद्धा आणि अनिष्ट चालीरीतीवर कुठाराघात करणारा या लघुपटाचे चित्रीकरण पुराडा या आदिवासी गावात पूर्ण करण्यात आले, हे विशेष. सदर लघुपट हा येत्या १५ ऑगस्ट रोजी प्रदर्शनासाठी तयार असल्याचे क्षितिजने बेरारटाईम्सला सांगितले.
ग्रामीण भागातील कलावंतांना मंच आणि संधी फारशा मिळत नसल्याने अनेक प्रतिभा दाबल्या जात असल्याची खंत क्षितिजने बोलून दाखविली. मी अशा कलावंतांना पुढे आणण्यासाठी काम करणार असल्याचा मानस सुद्धा त्याने व्यक्त केला. यासाठी त्याने ग्रामीण भागातच काम करण्याचे ठरविले आहे. क्षितिजला देवरीचे यादोराव पंचमवार हे नेहमी प्रोत्साहित करीत असल्याने त्याचे मनोबल उंचावल्याचे त्याच्या बोलण्यातून जाणवत होते. तो पंचमवार यांना आपले प्रेरणास्थान सुद्धा मानतो. त्याच्या या प्रयत्नाला बेरारटाईम्स कडून खूप खूप शुभेच्छा