धुळे : केंद्रात मोदींनी अच्छे दिनची घोषणा दिली आणि आता महाराष्ट्रात पोलिसांना काही प्रमाणात अच्छे दिन येण्याची शक्यता आहे. कारण सुट्टीच्या दिवशी पोलिसांनी काम केलं तर त्यांना त्या दिवशी दुप्पट पगार दिला जाणार आहे. गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी धुळ्यात ही घोषणा केली आहे.
धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा इथं पोलीस स्टेशनच्या इमारतीचं उद्घटन त्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. सध्या सुट्ट्याच्या दिवशी पोलिसांनी काम केलं तर फक्त 68 रुपये भत्ता मिळतो. मात्र यापुढे पोलिसांना त्या दिवसासाठी दुप्पट पगार मिळणार आहे.
याशिवाय सुमारे वीस हजार पोलीसांना शासकीय निवासस्थान मिळालं नाही. अशी कबुलीही गृहराज्यमंत्र्यांनी दिलीय. त्यासाठीही सरकार प्रयत्नशील असल्याचं त्यांनी सांगितलंय. त्यामुळं फडणवीस सरकारच्या काळात पोलिसांसाठी काही चांगले दिवस येण्याची शक्यता आहे.