बंगळुरु- तब्बल 32 वर्षांच्या अथक परिश्रमानंतर संपूर्ण स्वदेशी बनावटीचे हलक्या वजनाचे लढाऊ विमान ‘तेजस’ दृष्टिक्षेपात आले आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने (एचएएल) शनिवारी एका छोटेखानी कार्यक्रमात ‘तेजस’ LCA-SP1 हे विमान संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर आणि एअर चीफ मार्शल अनूप राहा यांना सोपविले. ही घटना भारतीय हवाई दलाच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरणार आहे.
‘तेजस’मध्ये 65 टक्के भारतीय स्पेअरपार्टचा वापर करण्यात आला आहे. 35 टक्के पार्ट्स हे अमेरिका आणि कॅडनातून आयात करण्यात आले आहेत. ‘तेजस’ला अमेरिकन इंजिन आणि इजेक्शन सीट्स बसवण्यात आल्या असून कॅनोपी शीट्सची निर्मिती कॅनडात करण्यात आली आहे.
हवाई दलाच्या ताफ्यात ‘तेजस’चा समावेश करण्यात आला आहे. सध्या समावेश करण्यात आलेल्या मॉडेलमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान, उड्डाणादरम्यान इंधन भरणे आणि लॉन्ग रेंज मिसाइल वाहून नेण्याच्या सुविधेचा अभाव आहे. मात्र, फाइनल ऑपरेशनल क्लियरेन्स कॉन्फिग्रेशन झालेल्या तेजसमध्ये या सर्व सुविधा असतील, असे सूत्रांनी सांगितले आहे.
एक इंजिन असलेले आणि हलक्या वजनाचे लढाऊ विमान ‘तेजस’ लवकरच ‘मिग 21’ची जागा घेईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे यंदापासून ‘तेजस’ युद्धासाठी सज्ज ठेवण्यात येणार आहे.
दरम्यान, 1983 मध्ये ‘तेजस’च्या निर्मितीची सुरुवात करण्यात आली होती. तेव्हा या प्रकल्पाची किंमत 560 कोटी रुपये होती. एका विमानाच्या निर्मितीला 25 कोटी रुपये खर्च लागणार होता. ‘तेजस’ने पहिले उड्डाण एक ऑक्टोबर 2014 ला घेतले होते. 10 जानेवारी 2011 ला ‘तेजस’च्या उड्डाणास हिरवी झेंडी दाखवण्यात आली.
‘तेजस’ वैशिष्ट्ये…
वजन: 12 टन
लांबी: 13.2 मीटर
उंची: 4.4 मीटर
पखांची घेर- 8.2 मीटर
स्पीड: ताशी 1350 किलोमीटर
‘तेजस’मध्ये हवेतून हवेत आणि हवेतून जमिनीवर मिसाइल्स, रॉकेट आणि बॉम्ब वाढून नेण्याची क्षमता आहे. ‘तेजस’ लवकरच MiG 21 आणि MiG 23 ची जागा घेणार असल्याची अपेक्षा आहे. त्यामुळे रशियन बनावटीचे MiG रिप्लेस केले जाणार आहेत. हवाई दलाने पहिल्या टप्प्यात 20 विमानांची मागणी केली आहे. भविष्यात 80 विमाने खरेदी करण्याची भारत सरकारने योजना आखली आहे. केंद्र सरकारने LCA वर (लाइट कॉम्पट एअरक्राफ्ट) सुमारे 14 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च केला आहे.