बालमृत्यू रोखण्यासाठी होत असलेल्या प्रामाणिक प्रयत्नांची नीती आयोगाकडून दखल- आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत

0
7

मुंबई, दि. 22 : बालमृत्यू रोखण्यासाठी राज्याचा आरोग्य विभागामार्फत होत असलेल्या प्रयत्नांची दखल नीती आयोगाने घेतली असून याकामी देशात महाराष्ट्रचे काम आदर्शव्रत आहे, अशी शाबासकीची थाप नीती आयोगाने दिली आहे. राज्यातील डॉक्टर्स, पॅरामेडिकल स्टाफ, एएनएम, आशा कार्यकर्ती या सर्वांच्या प्रयत्नांमुळे बालमृत्यू रोखण्यासाठी यश येत आहे, त्याचे प्रतिबिंब या अहवालात उमटले असल्याची अशी प्रतिक्रिया आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आज येथे व्यक्त केली.
२००५ -१५ या दशकभरात देशात १० लाख बालमृत्यू रोखण्यात यश आल्याचे नीती आयोगाच्या अहवालात म्हटले आहे. त्यात महाराष्ट्र हे बालमृत्यू रोखण्यासाठी आदर्श राज्य असल्याचा उल्लेख या अहवालात करण्यात आला आहे.नाशिक येथे झालेल्या अर्भक मृत्यू घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध झालेल्या या अहवालात बालमृत्यू रोखण्यासाठी होत असलेल्या प्रामाणिक प्रयत्नांची नीती आयोगाने दखल घेऊन त्याची प्रसंशाच केली आहे.
देशाचा अर्भक मृत्य दर (आयएमआर) ४० असून महाराष्ट्राचा २१ आहे तर ० ते ५ वर्ष वयोगटातील बालमृत्यू दर  देशाचा ४५ आहे आणि महाराष्ट्राचा २४ आहे.महाराष्ट्रातील अर्भक आणि उपजत मृत्यू रोखण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी तज्ञांची समिती गठीत केली. या समितीची काही दिवसांपूर्वी पहिली बैठकही घेण्यात आली.
राज्यातील एसएनसीयु वरील वाढता ताण लक्षात घेता १२ एसएनसीयुचे श्रेणीवर्धन करून त्यांच्या बेडची संख्या वाढविण्यात येत आहे. सध्या ३६ ठिकाणी असलेल्या एसएनसीयु मध्ये ६६० बेड असून श्रेणीवर्धनातून अतिरिक्त २३० बेड उपलब्ध होणार आहेत. त्याचबरोबर ३ ठिकाणी एन आय सी यु देखील निर्माण केले जाणार आहेत.
विशेष म्हणजे महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्थेचा अभ्यास करण्यासाठी उत्तरप्रदेशचे आरोग्यमंत्री त्यांच्या टीमसह नुकतेच येऊन गेले, त्यांनीही केंद्रीय आरोग्यमंत्री यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्राच्या आरोग्यसेवेचा अभ्यास करायला आल्याची प्रतिक्रिया दिली होती. राज्याचा बालमृत्यू आणि अर्भक मृत्यू दर कमी करण्यासाठी विभाग प्रयत्न
करीत आहे, असे आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले