‘स्वच्छता ही सेवा’ अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी आढावा बैठक

0
30

धुळे दि. 22 :  शासनातर्फे ‘स्वच्छता ही सेवा’ ही अभिनव योजना राबविली जात आहे. ही योजना जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्वांनीच प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे. केवळ ही योजना सरकारी असल्यामुळे आपला त्याच्याशी काहीही संबंध नाही, असे म्हणून चालणार नाही. तसेच या योजनेचा गैरफायदा किंवा त्याला गालबोट लावण्याचा कोणी प्रयत्न केल्यास संबंधिताला गय केले  जाणार नाही, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांनी येथे केले.
जिल्हा परिषद व महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्वच्छता ही सेवा’ हे अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी शुक्रवारी दुपारी शहरातील राजर्षी शाहू महाराज नाट्यमंदिरात आढावा बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. मंचावर महापौर कल्पना महाले, जि.प. अध्यक्ष शिवाजी दहिते,  जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे, जि.प.चे सीईओ गंगाथरन देवराजन, मनपा आयुक्त सुधाकर देशमुख, भाजपाच्या गटनेत्या प्रतिभा चौधरी, मनपा विरोधी पक्षनेते गंगाधर माळी, शिवसेना जिल्हा प्रमुख हिलाल माळी, महानगरप्रमुख सतीश महाले आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन वाहिद अली सैय्यद यांनी केले.