मुख्यमंत्र्यांनी यवतमाळमध्ये रुग्णालयात जाऊन फवारणीबाधित शेतक-यांची घेतली भेट

0
11

यवतमाळ,दि.22 – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज रविवारी कीटकनाशकांची फवारणी करताना विषबाधा झालेल्या शेतक-यांची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. सकाळी यवतमाळच्या जवाहरलाल दर्डा विमानतळावर आगमन झाल्यानंतर मुख्यमंत्री थेट वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गेले. तिथे विषबाधेमुळे उपचार घेत असलेल्या 26 रुग्णांच्या प्रकृतीची विचारपूस केली. कोणते औषध फवारले होते, उपचार कसे सुरू आहे, अशी विचारपूस करीत रुग्णांना दिलासा दिला. यानंतर मुख्यमंत्र्यांचा ताफा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाला. तिथे फवारणी विषबाधा प्रकरणावर अधिका-यांसोबत बैठक सुरू आहे. बैठकीला पालकमंत्री मदन येरावार, वसंतराव नाईक शेतकरी स्वालंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी, आमदार राजेंद्र नजरधने, आमदार डॉ.अशोक उईके उपस्थित आहेत.

आतापर्यंत ४७४ विषबाधितांवर वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयात उपचार झाले आहेत.  शनिवारी आणखी दोन विषबाधित रुग्ण दाखल झाले. मुख्यमंत्र्यांच्या दौ-यात प्रचंड बंदोबस्त असून, पत्रकारांनाही वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश दिला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वसंतराव नाईक शासकीय महाविद्यालयाच्या अतिदक्षता कक्षासह वॉर्ड क्र.१८ व १९ मध्ये जाऊन रुग्णांची विचारपूस केली.