पंतप्रधान मोदींनी चहा विकला की नाही ते माहित नाही परंतु देश मात्र नक्कीच विकला: कन्हैयाकुमार

0
11
कोल्हापूर,दि.08(विशेष प्रतिनिधी)-कोल्हापूरच्या राजर्षी शाहू महाराजांनी जातीपातीची व्यवस्था मोडून काढण्यासाठी आपल्या सामाजिक कामातून गंगाधर कांबळे याला हॉटेल काढून दिले. तेथे ते चहा विकत होते. एक हे जातीव्यवस्था मोडून काढण्यासाठी चहा विकणे होते. ते समाजातील भेदभाव मोडून काढण्यासाठी होते. आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीनी दावा केला होता कि ते चहा विकत होते. त्यांनी चहा विकला कि नाही ते माहिती नाही परंतु आता ते देश नक्कीच विकत आहेत, अशी टीका आज जेएनयु विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैया कुमार याने आज कोल्हापुरात केली.
 नोट बंदीनंतर 3 लाख करोड काळा पैसा परत आल्याचे सांगितले जात आहे मात्र असा कोणताही काळा पैसा परत आला नाही असे रिझर्व्ह बँक सांगत आहे. जर खरच काळा पैसा परत आला आहे तर मोदीजी तर ,बुलेट ट्रेनसाठी एक लाख कोटीचे जपानकडून कर्ज का घेता ? असा सवाल कन्हैयाकुमारने सरकारला केला. देशात नोटबंदी नंतर तणावाचे वातावरण वाढीला लागला आहे असे सांगून तो म्हणाला की ज्यांच्याजवळ काळा पैसा आहे त्यांना तो कसा लपवायचा याची चांगलीच माहिती आहे.
 काम करण्याच्या प्रयत्नात तीन वर्षे अशीच निघून गेली गेली. या देशात या तीन वर्षात काय महिलांवरील अत्याचार कमी झाला ? का नक्षलवाद कमी झाला? भ्रष्टाचाराचे प्रमाण कमी झाले का ? कोणते काम या सरकारने पूर्ण केले असा प्रश्न त्याने यावेळी उपस्थित केला. याउलट आता या देशातले ज्यांना भ्रष्टाचाराची विद्यापीठे म्हणता येईल अशा नेत्यांना भाजप आपल्याकडे वळवत आहे. या देशात मोदी आणि सरकारच्या विरोधात बोलले, प्रश्न विचारला की देशद्रोहाचा शिक्का मारला जातोय. त्यामुळे देशाच्या नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येत असल्याचे त्याने सांगितले
शेतकरी आत्महत्या, सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन, समान शिक्षण यांसारख्या प्रश्नापासून दूर नेण्यासाठी भाजपकडून राम मंदिर, ताजमहल सारखे मुद्दे समोर आणले जात आहेत असेही तो म्हणाला.