गणराज्यदिन सोहळाः दिल्लीत शिस्त तर गोंदियात बेशिस्तीचे प्रदर्शन

0
13

लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्यसैनिकांसह पत्रकारांनाही केला अडथळा

गोंदिया- गेल्या २६ तारखेला देशभरात भारतीय प्रजासत्ताकाचा सोहळा मोठ्या थाटात पार पडला. सर्वत्र हा सोहळा अत्यंत शिस्तबद्धरीत्या होत असताना गोंदिया येथे आयोजित शासकीय ध्वजारोहण सोहळ्यात मात्र कर्मचाऱ्यांनी बेशिस्तीचा कळस गाठून मर्यादा ओलांडल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, दिल्लीत विदेशी पाहुण्यांसह शिस्तीत कार्यक्रम होत असताना गोंदियाच्या निगरगट्ट कर्मचाऱ्यांना प्रशासन काही अद्दल घडविणार की नाही, असा प्रश्न नागरिकांनी प्रशासनाला केला आहे.
२६ जानेवारी हा दिवस आपल्या देशात प्रजासत्ताक सोहळा म्हणून मोठ्या थाटात साजरा केला जातो. देशाच्या राजधानीसह सर्वच मोठ्या सरकारी कचेऱ्यांच्या ठिकाणी शासकीय स्तरावर या सोहळ्यांचे आयोजन केले जाते. या सोहळ्यासाठी अगदी सामान्यातील सामान्य व्यक्ती सुद्धा हजेरी लावत असतात. कार्यक्रमात कोणालाही अडचण होऊ नये, यासाठी प्रशासन खबरदारी घेते.
दिल्ली येथे झालेल्या सोहळ्यात जागतिक महासत्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षानेसुद्धा शिस्तीने सोहळ्यात सहभाग घेतला. मात्र, गोंदिया येथे कर्मचाऱ्यांच्या मुजोरवृत्तीने या सोहळ्याला गालबोट लागले. जिल्हा पोलिस प्रशासनावर या कार्यक्रमात शिस्त राखली जाण्याची जबाबदारी होती. जिल्हा पोलिस मुख्यालयाच्या मैदानात आयोजित कार्यक्रमातसुद्धा जनतेसाठी बैठकव्यवस्थासुद्धा करण्यात आली होती. यात लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, स्वातंत्र्यसैनिक प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी, अधिकारी-कर्मचारी यांचेसाठी प्रेक्षकदीर्घा सुद्धा होत्या.
असे असताना ज्याठिकाणी, आमदारांसह लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्यसैनिक आणि पत्रकारमंडळींसाठी व्यवस्था करण्यात आली, त्या जागेसमोर पोलिस विभागाने संचलनासाठी टेबल लावले होते. याठिकाणी, जि.प.चे कर्मचारी-अधिकारी, सामाजिक वनीकरण, बालकल्याणविभागाचे कर्मचारी हे ५०-६० च्या घोळक्याने हजर होते. या कर्मचाऱ्यांनी मागे बसलेले आमदार, लोकप्रतिनिधी, पत्रकार आणि स्वातंत्र्यसैनिकांना कार्यक्रम पाहण्यास जाणीवपूर्वक अडथळा निर्माण केला होता. कार्यक्रम अगदी शिस्तीत होत असताना सदर ठिकाणी असलेले कर्मचारी व अधिकारी यांनी वेळेचे गांभीर्य न दाखविता फिदीफिदी हसत कार्यक्रमाचा फज्जा केला. यामुळे कार्यक्रमस्थळी नेमके काय चालले आहे, हे तेथे बसलेल्या मान्यवरांना कळत नव्हते. पोलिस प्रशासनाने केलेले आयोजनसुद्धा अगदी ढिसाळ असल्याचे दिसून आले. याविरोधात नागरिकांनीसुद्धा नाराजी व्यक्त करीत कर्मचाऱ्यांच्या मग्रुरीचा निषेध केला.