नायगावात शिवसेना-काँग्रेस लढा!

0
9

मुंबई -नायगाव येथे आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समक्षच राणे समर्थक काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर यांचे कार्यकर्ते आणि शिवसैनिकांमध्ये ‘घोषणायुद्ध’ रंगलं. कोळंबकर यांच्या भाषणाने पेटलेला हा वाद कोळंबकर आणि पोलिसांच्या मध्यस्थीनेच नंतर थांबला.

नायगाव येथील ‘बॉम्बे डाइंग’च्या ८.१५ एकर भूखंडावर भव्य असं थीमपार्क उभारलं जाणार आहे. संयुक्त महाराष्ट्र लढ्यात बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांचं स्मरण करण्यासाठी तसेच या लढ्याचा इतिहास पुढच्या पीढीनेही जपावा, या उद्देशाने मुंबई पालिकेच्या वतीने हे थीमपार्क उभारण्यात येत आहे. या थीमपार्कचं भूमिपूजन आज उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडलं. मात्र, या कार्यक्रमाला स्थानिक आमदार म्हणून उपस्थित असलेल्या कालिदास कोळंबकर यांच्या भाषणाने वादाचा अंक सुरू झाला. कोळंबकर यांनी स्प्रिंग मिलच्या घरांसाठी आपण २२ वर्षे संघर्ष केल्याचा उल्लेख केला आणि त्याला उपस्थित शिवसैनिकांनी जोरदार विरोध केला. कोळंबकर यांच्याविरोधात घोषणा देण्यात आल्या. त्याला प्रत्युत्तर म्हणून कोळंबकर यांच्या कार्यकर्त्यांनीही घोषणा देण्यास सुरूवात केली. त्यामुळे कोळंबकर समर्थक विरूद्ध शिवसैनिक असे घोषणायुद्ध रंगले.

वाढता तणाव लक्षात घेऊन कोळंबकर यांनी आपलं भाषण थांबवलं आणि कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं. पोलिसांनीही हस्तक्षेप करत दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांना शांत केलं. त्यामुळे काही वेळातच हा गोंधळ थांबला आणि पुन्हा एकदा कार्यक्रम सुरू होऊन निर्विघ्नपणे पार पडला.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच फाइव्ह गार्डनच्या सुशोभिकरणाच्या उद्घाटनालाही उद्धव यांना शिवसेना-काँग्रेस संघर्षाचे साक्षीदार व्हावे लागले होते.