मोदींवर पराभवाचे खापर फुटू न देण्याची तयारी

0
7
वाढदिवसाच्या शुभेच्छा

नवी दिल्ली – दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी शनिवारी झालेल्या मतदानानंतर बहुतेक सर्वच एक्झिट पोलने अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वात ‘आप’ विजयी होत असल्याचे म्हटले आहे. भाजपने निकाल जाहीर होऊ द्या, त्यानंतरच त्यावर प्रतिक्रिया दिली जाईल असा सावध पवित्रा आज घेतला आहे. मात्र, सूत्रांचे म्हणणे आहे, की भाजपला पराभवाची जाणीव झाली आहे. मतदानानंतर भाजपने केलेल्या सर्वेक्षणात पक्ष क्रमांक दोनवर असल्याचे दिसून आले आहे. या पक्षांतर्गत सर्वेमध्ये ‘आप’ला 32 ते 34 आणि भाजपला 30 ते 33 जागा मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर त्यांचे वैचारिक अधिष्ठान असलेल्या आरएसएसने देखील पक्षाला बहुमत मिळत नसल्याचा निष्कर्ष नोंदविला आहे. आता भाजप पोस्टर बॉय नरेंद्र मोदी यांच्यावर पराभवाचे खापर फुटणार नाही याची रणनीती आखत आहे. सत्रांच्या माहितीनुसार, मंगळवारी निकाल जाहीर झाल्यानंतर मोदी आणि भाजपचा बचाव कसा करायचा याच्यावर पक्षात विचारमंथन सुरु झाले आहे.
भाजपने बोलावली रिव्ह्यू मीटिंग
दिल्ली भाजपने रविवारी सायंकाळी रिव्ह्यू मीटिंग बोलावली आहे. या बैठकीत दिल्ली भाजप प्रभारी प्रभात झा, पक्षाच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार किरण बेदी, प्रदेशाध्यक्ष सतीश उपाध्याय आणि सर्व उमेदवार उपस्थित राहाणार आहेत. दुसरीकडे, भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विट केले आहे, की एक्झिट पोलचे अंदाज खरे ठरले तर, पक्षाला आपल्या धोरणांवर नव्याने विचार करावा लागेल.

सीतारमण यांनी घेतली बेदींची भेट
दिल्लीतील भाजपच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार किरण बेदी यांनी पक्षाच्या जय-पराजयाची जबाबदारी आपली राहील याची आधीच घोषणा केली आहे. आज सकाळी केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण यांनी त्यांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना सीतारमण म्हणाल्या, ‘एक्झिट पोल, ओपिनियन पोल यांचे आपापल्या ठिकाणी वेगळे महत्त्व असते. आम्ही निकालाची वाट पाहात आहोत. आम्हाला विश्वास आहे, की निकाल आमच्या बाजूनचे लागेल.’ व्हिजन डॉक्यूमेंट उशिरा प्रसिद्ध केल्याने पक्षाची हानी झाली का? या प्रश्नावर त्या म्हणाल्या, ‘हा पक्षाचा निर्णय आहे. लोकसभा निवडणुकीवेळी देखील आम्ही शेवटी घोषणापत्र जाहीर केले होते. त्याने काहीही फरक पडत नाही. पक्षांतर्गत अनेक फॅक्टर असतात त्याच्या आधारावर व्हिजन डॉक्यूमेंट किंवा घोषणापत्र जाहीर करण्याचा निर्णय घेतला जातो.’