24.2 C
Gondiā
Friday, August 21, 2026
Home महाराष्ट्र ग्रामीण पाणीपुरवठा समित्यांचे अधिकार काढले;सरकारी पैशांतून शेतांपर्यंत रस्ते

ग्रामीण पाणीपुरवठा समित्यांचे अधिकार काढले;सरकारी पैशांतून शेतांपर्यंत रस्ते

0
30

मुंबई,दि.23 : ग्रामीण पाणीपुरवठा योजना अंमलबजावणीचे संबंधित ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समितीकडे असलेले दोन कोटी रुपयांपर्यंतच्या कामांच्या अंमलबजावणीचे अधिकार रद्द करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने गुरुवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतला.त्यासोबतच शेतीला लागणारी यंत्रसामग्री शेतापर्यंत नेता यावी, शेतमाल बाजारात पोहोचविता यावा यासाठी बारमाही शेतरस्ते (पाणंद रस्ते) बांधण्यासाठी शासनाच्या विविध योजनांमधून निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णयही घेण्यात आला.
जिल्हा परिषदेकडे दोन कोटी ते साडेसात कोटी रुपयांपर्यंतच्या कामाच्या अंमलबजावणीचे अधिकार सुधारित करून ते आता पाच कोटी रुपयांपर्यंत ठेवण्यात आले आहेत. तसेच पाच कोटी रुपयांवरील कामांच्या अंमलबजावणीचे अधिकार महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकडे सोपविण्यात आले आहेत.
आघाडी सरकारच्या काळात दोन कोटी रुपयांपर्यंत खर्चाच्या ग्रामीण पाणीपुरवठा योजना या स्थानिक ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समितीकडे देण्यात आल्या होत्या. त्यात प्रचंड घोटाळे झाले. योजना रखडल्या आणि कोट्यवधी रुपयांचा निधी वाया गेला. आता ज्या समित्यांकडे निधी शिल्लक आहे त्यांच्याकडील निधी जिल्हा परिषदांकडे वर्ग करण्यात येणार आहे.

या योजनेंतर्गत माती, दगड व मुरूम टाकून कच्चे शेतरस्ते किंवा पाणंद रस्त्यांचे मजबुतीकरण करणे, तसेच पाणंद रस्ता अतिक्रमणमुक्त करून कच्चा रस्ता तयार करणे आणि पाणंद रस्ता अतिक्रमणमुक्त करून कच्चा व पक्का रस्ता एकत्रितपणे बांधणे या ३ बाबींचा समावेश आहे. यासाठी चौदावा वित्त आयोग, मनरेगा, खासदार-आमदार विकास निधी, वैधानिक विकास महामंडळांतर्गतचा निधी, गौण खनिज विकास निधी या बरोबर ग्रामपंचायतीला जनसुविधांसाठी मिळणारे अनुदान, महसुली अनुदान, पेसाअंतर्गत निधी व स्व-निधी, जिल्हा परिषद व पंचायत समिती सेस आणि इतर जिल्हा योजनांमधून मिळणारा निधी अशा विविध योजनांमधून मिळणारा निधी खर्च करण्यासही मंत्रिमंडळाने मान्यता दिली. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीस राज्य, जिल्हा, तालुका व ग्रामस्तरीय समित्यांची स्थापना केली जाईल. तसेच शेतरस्ते तयार करण्यात येणाºया ठिकाणालगत शेतकºयांचा समावेश असलेली शेतरस्ते समिती स्थापन केली जाईल.
विधानसभा निवडणुकीला एक वर्ष बाकी असताना पाणंद रस्त्यांच्या निमित्ताने सत्तारूढ पक्षाच्या कंत्राटदार कार्यकर्त्यांचे चांगभले होऊ शकेल. यापूर्वी पाणंद रस्ते केवळ कागदावर दाखविण्यात आल्याचा अनुभव आहे.