गृहराज्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा – धनंजय मुंडे

0
9

पाथर्डी (जि.अहमदनगर) : गृहराज्यमंत्र्यांच्या जिल्ह्णात कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचा-यांचा खून होतो़ ज्या राज्यात पोलीस सुरक्षित नाहीत तेथे सर्वसामान्यांचे रक्षण कोण करणार, असा प्रश्न विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी गुरुवारी केला़. तसेच ज्या टोळीने पोलीस कर्मचाऱ्याचा खून केला, त्या टोळीचा म्होरक्या भाजपाचा जिल्हा परिषदेचा सदस्य आहे़ त्याला जेरबंद केल्यास सर्व आरोपी मिळतील. या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारुन गृहराज्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी मुंडे यांनी केली.

शहीद दीपक कोलते याच्या माळीबाभुळगाव या गावी गुरुवारी सकाळी मुंडे यांनी भेट देऊन कोलते कुटुंबीयांचे सांत्वन केले़ त्यानंतर पत्रकारांशी बोलताना मुंडे म्हणाले, पोलीस खून प्रकरणात कोण आरोपी आहेत, हे माहिती आहे़ परंतु त्यांच्यावर सत्ताधारी पक्षाचा दबाव आहे. या प्रकरणाची सीआयडी चौकशी व्हावी, यासाठी मी महासंचालकांची भेट घेणार आहे़ आतापर्यत कोलते कुटुंबीयांना सरकारने दोन लाख रुपये मदत देणे क्रमप्राप्त होते़ तसेच त्यांच्या पत्नीला शासकीय सेवेत तात्काळ सामावून घ्यावे, अशी मागणी त्यांनी केली़ गृहमंत्री म्हणून मुख्यमंत्र्यांनी या कडे लक्ष दिले पाहिजे़