आंबेडकरांचे विचार आत्मसात करण्याची गरज

0
6

नाशिक,दि.3 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २ मार्च १९३० रोजी ऐतिहासिक सत्याग्रह करून दलितांना काळाराम मंदिरात प्रवेश मिळवून दिला. समाजातील जातिभेद निर्मूलनासाठी त्यांनी प्रयत्न केले. परंतु, सध्या काही समाजविघातक शक्ती वेगवेगळ्या जातिधर्मांत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. या स्थितीवर मात करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आत्मसात करून त्यांनी दिलेल्या राज्यघटनेचा आदर व पालन करण्याची गरज असल्याचा सूर अभिवादन सभेत उमटला.गोदाघाटावरील गौरी पटांगणावर काळाराम मंदिर सत्याग्रह दिनानिमित्त शुक्रवारी (दि. २) नाशिक काळाराम मंदिर सत्याग्रह भूमिपुत्र समितीतर्फे आयोजित अभिवादन सभेत वेगवेगळ्या समाज व संघटनांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला. अभिवादन सभेच्या अध्यक्षस्थानी ओबीसी जनक्रांती परिषदेचे अध्यक्ष अनिल महाजन यांच्यासह व्यासपीठावर रिपाइं गवई गटाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. राजेंद्र गवई, छावा क्रांतिवीर संघटनेचे अध्यक्ष करण गायकर, माजी महापौर अशोक दिवे, राष्ट्रीय नेते तानसेन नन्नावरे, अण्णासाहेब कटारे, नाना भालेराव, गणेश उन्हवणे, आनंद सोनवणे, सचिन खरात, नगरसेवक राहुल दिवे, प्रियंका घाटे, शांताबाई हिरे आदी उपस्थित होते. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. यावेळी वामनदादा कर्डक यांच्या विविध भीमगीतांसह बुद्धगीतांच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. स्वागताध्यक्ष किशोर घाटे यांनी प्रास्ताविक, तर दीपक नन्नावरे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी प्रकाश पगारे, मुकुंद गांगुर्डे, कै लास तेलोरे, रोषन घाटे, योगेश नन्नावरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. काळाराम मंदिरात २ मार्च १९३० रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दलितांना प्रवेश मिळवून देण्यासाठी सुरू केलेल्या सत्याग्रहासह महाड येथील चवदार तळ्याचे पाणी दलितांना खुले करून देणाºया सत्याग्रहाचे वर्णन ‘दिले दलितांना करून खुले, काळाराम मंदिर, चवदार तळे’ यासारख्या विविध बुद्ध व भीमगीतांच्या माध्यमातून गायक संतोष जोंधळ यांनी केले. त्यांच्यासह संगीत मंडळाने सादर केलेल्या भीमगीतांवर उपस्थितांना ठेका धरायला लावला.