हिंदुत्ववादी संघटनांची यादी जाहीर करा, अॅड. प्रकाश आंबेडकर यांची मागणी

0
13

नागपूर- ‘हिंदू समाजातील काही संघटना धार्मिक प्रचाराच्या नावाखाली आपल्या विरोधकांचा वैचारिक मुकाबला न करता त्यांना संपवत आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन प्रणेते नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे हे अशाच धर्मांध शक्तींचे बळी ठरले. लोकशाहीऐवजी ठोकशाही मानणाऱ्या धर्मांध शक्तींना धडा शिकवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जहाल आणि मवाळ हिंदुत्ववादी संघटनांची आठवडभरात यादी जाहीर करावी,’ अशी मागणी भारिप- बहुजन महासंघाचे अध्यक्ष माजी खासदार अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली.
नागपुरात एका कार्यक्रमासाठी आले असताना शनिवारी रविभवन येथे ते पत्रकारांशी बोलत होते. पुरोगामी नेत्यांच्या हत्यांची सुरुवात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यापासून झाली. महात्मा गांधी यांच्या हत्येत नथुराम गोडसेला शिक्षा झाली; परंतु भारत सरकारने महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या गोडसेमागे असणारी धर्मांध शक्ती शोधली नाही. ठोकशाहीच्या भरवशावर राज्य निर्माण करू पाहणाऱ्या संघटनांना समाजासमोर उघडे पाडले पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी लोकशाहीचा पुरस्कार करणाऱ्या हिंदुत्ववादी संघटनांची यादी जाहीर करावी,अशी मागणी त्यांनी केली.