२८ जानेवारीपर्यंत वाळू साठ्यांची माहिती सादर करण्याचे राज्य पर्यावरण समितीचे निर्देश

0
17

गोंदिया,दि.25(खेमेंद्र कटरे)– राज्यात रखडलेली वाळू  घाटांची लिलाव प्रक्रिया मार्गी लावण्यासाठी नद्यांमधील वाळू घाटांत उपलब्ध वाळू साठा, वाळू घाटांचे नकाशे व घाटांच्या खोलीबाबत विचारणा करीत, यासंदर्भात संबंधित मुद्यांची माहिती २८ जानेवारीपर्यंत ‘आॅनलाइन’ सादर करण्याचे निर्देश राज्य पर्यावरण समितीमार्फत राज्यातील सर्व जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.मात्र आजही पर्यावरणाचा नियमाला डावलून आणि घाट लिलाव झालेले नसतानाही खुलेआम वाळूचा उपसा सुरु झालेला आहे.तर गोंदिया,भंडारा व नागपूर जिल्ह्यात मध्यप्रदेशातील वाळू घाटाच्या राॅयल्टीवर महाराष्ट्रात वाळूची अवैधरित्या विक्री महसूल व पोलीस विभागाच्या डोळ्यात धुळफेकून सुरु आहे.
राष्ट्रीय हरित लवादाच्या ११ डिसेंबर २०१८ रोजीच्या आदेशानुसार वाळू घाटांसंदर्भात पर्यावरण विभागाने गत १५ जानेवारी २०१६ रोजी काढलेली अधिसूचना निलंबित करण्यात आली आहे. त्यानुसार राज्यातील जिल्हास्तरीय पर्यावरण समित्या बरखास्त करण्यात आल्या आहेत. त्यामुळे राज्यातील सर्वच जिल्ह्यांत वाळू घाटांची लिलाव प्रक्रिया रखडली आहे. त्यानुषंगाने वाळू घाटांची लिलाव प्रक्रिया मार्गी लावण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील नद्यांमध्ये उपलब्ध वाळू साठा, वाळू साठ्याचे पुनर्भरण, वाळू घाटांचे नकाशे व वाळू घाटांची खोली यासंदर्भात विचारणा करीत, संबंधित मुद्यांची माहिती २८ जानेवारीपर्यंत आॅनलाइन सादर करण्याचे निर्देश राज्य पर्यावरण समितीने राज्यातील सर्व जिल्हा खनिकर्म अधिकाºयांना दिले. त्यानुसार वाळू घाटांसंदर्भात संबंधित मुद्यांची माहिती तयार करून राज्य पर्यावरण समितीकडे पाठविण्याची प्रक्रिया जिल्हा खनिकर्म अधिकारी कार्यालयांला करावी लागणार आहे.

‘या’ मुद्यांची मागितली माहिती!

  • -वाळू घाटांचे सर्व्हे नंबर, गट नंबर व वाळू घाटांच्या भौगोलिक स्थानांचे अक्षांश-रेखांशासह वाळू घाटांची माहिती.
  • -नदीतील पाणी वापराचे प्रमाण, वाळू घाटात पोहोचण्याचा मार्ग, पर्यावरण व्यवस्थापन व त्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी.
  • -नदीचे नाव, उपलब्ध वाळू साठा, वाळू साठ्याचे पुनर्भरण, नकाशे, वाळू साठ्याची खोली.
  • -वाळू घाटांसंदर्भात आक्षेप असल्यास त्यासंदर्भात करण्यात आलेली कार्यवाही.
  • -वाळू घाटांचा खाणकाम आराखडा व खाण बंद करण्याबाबतचा आराखडा.
  • -प्रस्तावित वाळू उत्खननामुळे सभोवतालच्या पर्यावरणावर होणारे परिणाम.