मोदी सरकारला पुन्हा बळी पडू नका : पटेल

0
10

पवनी ,दि.25ः: मोदी सरकारने काँग्रेसने सुरू केलेल्या सगळ्या योजना बंद केल्यात. पेट्रोल-डिझेलचे भाव वाढविलेत, शेतकऱ्यांना कर्ज माफी केली नाही. लोकांच्या जनधन योजनेत एकही रुपया टाकला नाही. ४ लाख रिक्त पदे असून अजूनही मेगा भरती केली नाही. भेलसारखा कारखाना बंद केला. मिहानचे काम बंद पाडले. भंडारा-गोंदिया जिल्ह्याचा विकास केला नाही. एससी, एसटी वगळता ९० टक्के ओबीसींची शिष्यवृत्ती बंद केली. बेरोजगारांना काम नाही. गोरगरिबांच्या योजना रखडल्या. त्यामुळे जनतेने आता तरी सावध होऊन मोदी सरकारला पाडण्याचा प्रयत्न करावा. याकरिता सर्वांनी एकत्र येऊन काँग्रेस आघाडीला भरघोस यश मिळवून देण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे महासचिव खासदार प्रफुल्ल पटेल यांनी पवनी येथे आयोजित बूथ कमिटीच्या सभेमध्ये केले. .

ते म्हणाले, आघाडीचे सरकार निवडून आल्यानंतर धानाला २५०० रुपये प्रति क्विंटल भाव देण्यात येईल. पुढील महिन्यात होणाऱ्या अर्थ संकल्पात वाटेल तेवढ्या घोषणांचा पाऊस मोदी सरकार पाडतील. परंतु या आमिषाला कोणीही बळी पडू नये कारण साडेचार वर्षांची मोदी कारकीर्द सर्वांनी बघितली आहे. एकही जागा सरकारने भरली नाही. तेव्हा मोदी सरकारला धडा शिकविण्याची हीच वेळ आता आली आहे.बूथ कमिटीच्या सभेमध्ये मागील पोटनिवडणुकीचा आढावा घेण्यात आला. सर्व कार्यकर्त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. बूथ कमिटीच्या सदस्या अनुपस्थितीबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. बूथ कमिटीच्या सभेकरिता माजी आमदार नाना पंचबुद्धे, धनंजय दलाल, कल्याणी भुरे, जि.प.उपाध्यक्ष विवेकानंद कुर्झेकर, पंढरीनाथ सावरबंाधे, डॉ.विजय ठक्कर, हिरालाल खोब्रागडे, महिला प्रदेश सचिव सुनंदा मुंडले, किशोर पालांदूरकर, तोमेश्वर पंचभाई, राकॉ तालुका अध्यक्ष लोमेश वैद्य, शहर अध्यक्ष यादव भोगे, नगरसेवक सानू बेग, शोभना गौरशेट्टीवार आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती .

पवनी तालुक्यात एकूण १६५ बुथ असून पवनी येथे २४ अड्याळ येथे १० बूथ असून, पं. स. सर्कल मध्ये १४ बूथ आहेत. विशेष म्हणजे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी जवळजवळ दोन तास राकांॅ पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा वर्ग घेतला. फेब्रुवारीमध्ये पुन्हा कार्यकर्त्यांचा वर्ग घेण्यात येईल. तेव्हा सर्वांनी करीत असलेल्या कामाची तयारी करून यावी, असेही त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना आवाहन केले. कार्यक्रमाचे संचालन राकांॅ तालुका अध्यक्ष लोमेश वैद्य यांनी केले. आभार प्रदर्शन पं. स. सदस्य तोमेश्वर पंचभाई यांनी केले..