सातवे राज्यस्तरीय व्यसनमुक्ती साहित्य संमेलन 2 व 3 फेब्रुवारीला चंद्रपूर येथे

0
8

चंद्रपूर, दि. 01 : सातवे राज्यस्तरीय व्यसनमुक्ती साहित्य संमेलन दि. 2 व 3 फेब्रुवारी रोजी चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले आहेत. संमेलनाध्यक्ष पद्मश्री डॉ. अभय बंग असून या कार्यक्रमाचे उद्‌घाटन केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहिर व राज्याचे वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे राज्यमंत्री दिलीप कांबळे व आदिवासी विकास राज्यमंत्री अम्ब्रीशराजे आत्राम यांच्या उपस्थितीत होणार आहे.

चंद्रपूर येथील चांदा क्लब ग्राऊंडवर आयोजित केलेल्या या संमेलनाचे उद्‌घाटन शनिवार दि. 2 फेब्रुवारी रोजी सकाळी 10.30 वाजता होणार आहे. तत्पूर्वी सकाळी 8 वाजता व्यसनमुक्ती दिंडी ज्युबली हायस्कूल मैदान येथून प्रारंभ होणार आहे.चांदा क्लब ग्राऊंडवर आयोजित दोन दिवसीय संमेलनात ‘तंबाखू मुक्त महाराष्ट्राचे स्वप्न आणि वास्तव’, ‘व्यसनमुक्ती उपचार पद्धती, गरज आणि यश’, ‘दारुबंदीनंतर चंद्रपूर, वर्धा व गडचिरोली जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेमुळे झालेले सकारात्मक बदल, प्रशासन आणि समाजाची जबाबदारी’, ‘अमली पदार्थांचा विळखा आणि उपाय योजना,’ ‘व्यसनमुक्ती प्रसार माध्यमे आणि साहित्यिकांची जबाबदारी’ या विषयावर मान्यवरांच्या उपस्थितीत चर्चासत्र होणार आहे.

दि. 2 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 वाजता सप्तखंजेरी वादक सत्यपाल महाराज यांचे जाहीर प्रबोधन कार्यक्रम होणार आहे. दि. 3 फेब्रुवारी सकाळी 11 वाजता सप्तखंजेरी वादक तुषार सूर्यवंशी यांचा कार्यक्रम होणार आहे. 2017-18 व 2018-19 च्या व्यसनमुक्ती सेवा पुरस्कारांचे होणार वितरण सातव्या राज्यस्तरीय व्यसनमुक्ती साहित्य संमेलनात व्यसनमुक्ती क्षेत्रात मौलिक काम करीत असलेल्या व्यक्तींना व संस्थांना सन 2017-18 व 2018-19 च्या राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.या संमेलनास जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी केले आहे.