राजपत्रित अधिकारी महासंघाच्या मागण्यांबाबत लवकरच बैठक : मुख्य सचिव

0
17

मुंबई, दि. 30 : राजपत्रित अधिकाऱ्यांच्या विविध मागण्यांच्या अनुषंगाने महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसमवेत लवकरच बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन मुख्य सचिव अजोय मेहता यांनी बुधवारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांना दिले.महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी आज मुख्य सचिव श्री. मेहता यांची त्यांच्या दालनात भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.यावेळी अध्यक्ष विनोद देसाई, सरचिटणीस समीर भाटकर, उपाध्यक्ष विनायक लहाडे, संघटन सचिव सुदाम टाव्हरे, महासंघाच्या दुर्गा मंचच्या मुंबई उपनगर जिल्हाध्यक्षा वंदना गेवराईकर, मंत्रालय अधिकारी संघटनेचे विष्णू पाटील उपस्थित होते.

          आतापर्यंतच्या सर्व मुख्य सचिवांचे महासंघास चांगले सहकार्य मिळाल्याचे यावेळी महासंघाचे मुख्य सल्लागार ग. दि. कुलथे यांनी निदर्शनास आणले. श्री. मेहता यांचा बृहन्मुंबई महानगरपालिकेतील मोठा प्रशासकीय अनुभव राज्यातील अधिकाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी उपयुक्त ठरेल. महासंघाच्या मागण्यांविषयी मुख्यमंत्री सकारात्मक असतात. मात्र, अद्याप काही प्रश्न प्रलंबित असून ते लवकरात लवकर सुटावे, अशी अपेक्षाही श्री. कुलथे यांनी व्यक्त केली.

         राजपत्रित अधिकारी महासंघाच्या कार्यकारिणीची 4 जून रोजी बैठक असून त्यापूर्वी मुख्य सचिवांना महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक घ्यावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी महासंघाने मुख्य सचिवांना निवेदन दिले. त्यामध्ये 7 व्या वेतन आयोगातील वेतनत्रुटी अहवाल, सुधारित वेतनावर वाहतूक भत्ता, 5 दिवसांचा आठवडा, सेवा निवृत्तीचे वय केंद्र शासनाप्रमाणे 60 वर्षे करणे, सर्व रिक्त पदे भरणे, कंत्राटी पद्धतीने नेमणुका न करणे, प्रशंसनीय कामाबद्दल आगावू वेतनवाढ, महिला कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे बालसंगोपन रजा, अधिकाऱ्यांच्या पाल्यांना अनुकंपा तत्वावर सेवासुविधा आदी मागण्यांचा समावेश आहे.