शिवसेना आमदार पाटील यांना एक महिना कैद

0
7

भुसावळ दि. 20– धरणगाव येथील रेल्वेगेट बंद हाेत असताना गेटखालून जाणार्‍या रिक्षावर लोखंडी रॉड पडला. त्यामुळे रिक्षाचे नुकसान झाल्याने शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांच्यासह ४० कार्यकर्त्यांनी धरणगाव रेल्वेस्थानकावर स्टेशन मास्तरच्या कार्यालयात गाेंधळ घालून शिवीगाळ केली होती. सन २००२ मध्ये झालेल्या या प्रकरणात भुसावळ रेल्वे न्यायालयाने आमदार पाटील यांना मंगळवारी एक महिन्याची साधी कैद व गेटमनला ५० हजार रुपये नुकसान भरपाई द्यावेत, असे आदेश दिले. दरम्यान, न्यायालयाने लगेचच पाटील यांना जामीनही मंजूर केला.

धरणगाव रेल्वेगेटवर ६ एप्रिल २००२ राेजी सकाळी १० ते ११ वाजेच्या सुमारास गेटमन ईश्वर भीमसिंग गेट बंद करीत होते. या वेळी धर्मेश नावाच्या रिक्षाचालकाने दांडगाईने रिक्षा आत टाकली. परिणामी लोखंडी दांड्यामुळे रिक्षाचा काच फुटला. यामुळे धर्मेशने गेटमनशी वाद घालून कामात अडथळा आणला. यादरम्यान तेथे आलेले िशवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांना धर्मेशने झालेल्या प्रकाराबाबत माहिती दिली. यानंतर पाटील यांच्यासह ४० जणांनी धरणगाव रेल्वेस्थानक गाठून गाेंधळ घातला होता. ‘स्टेशन मास्तर विजय सुरसुरे यांनी बसण्यास खुर्ची दिली नाही. माझा अपमान केला’, असे म्हणत त्यांच्या थाेबाडीत मारली हाेती. याबाबत अमळनेर येथील लाेहमार्ग पाेलिस ठाण्यात गुलाबराव पाटील यांच्यासह अन्य ४० जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.
या खटल्याचे कामकाज भुसावळ येथील रेल्वे न्यायालयात न्यायाधीश मनीष फटांगरे यांच्यासमाेर चालले.सरकारपक्षातर्फे अॅड. सुभाष कासार यांनी काम पाहिले.

अपील करणार
रेल्वे न्यायालयाने दिलेल्या शिक्षेविरुद्ध अपील करणार आहे. मी कार्यकर्त्यांसाठी लढलाे. मात्र, ज्या कार्यकर्त्यासाठी वाद घातला, ताेच कार्यकर्ता दुर्दैवाने या जगात राहिला नाही. – गुलाबराव पाटील, आमदार, जळगाव ग्रामीण