बाक्टीच्या डाॅक्टराचा प्रताप, गर्भवतीची कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया

0
14

सतिश कोसरकर
अर्जुनी-मोरगाव,दि.20-महिलेच्या पोटात गर्भ असतानाही कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्याची घटना प्राथमिक आरोग्य केंद्र चान्ना बाकटी येथे घडली. पीडित महिलेचे नाव शैला प्रकाश सुखदेवे असे आहे. सध्या ती साडेसहा महिन्यांची गर्भवती आहे. आरोग्य विभागाच्या या अक्षम्य दुर्लक्षित कारभाराची चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याची मागणी सदर महिलेचे पती प्रकाश सुखदेवे यांनी पालकमंत्र्यांसह संबंधित वरिष्ठाकडे केली आहे.

प्राप्त माहितीनुसार, सिरेगावबांध येथील शैला प्रकाश सुखदेवे या महिलेने दोन अपत्यानंतर २६ नोव्हेंबर २०१४ रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र चान्ना-गाकटी येथे स्त्री नसबंदी शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्याला शैलाच्या पोटात गोळा असल्याचे दिसून आले. त्यांनी तो कशाचा गोळा आहे. याकडे लक्ष न देता तिची शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रियेनंतर चार महिन्याने तिच्या पोटात दुखणे सुरु झाले. तेव्हा भंडारा जिल्ह्याच्या साकोली येथील नाफडे नर्सिंग होममध्ये शैलाला उपचारासाठी नेण्यात आले. डॉ.पल्लवी नाफडे यांनी सोनोग्राफी करण्याचा सल्ला दिला. ३ एप्रिल रोजी करण्यात आलेल्या सोनोग्राफीत शैलाच्या पोटात पाच महिन्याचा गर्भ असल्याचे दिसून आले. याचा अर्थ ज्यावेळी शैलाची शस्त्रक्रिया झाली त्यावेळी तिला एक ते दीड महिन्यांची गर्भधारणा झाली होती. शस्त्रक्रियेपुर्वी झालेल्या तपासणीत त्या गोळ्याकडे का दुर्लक्ष करण्यात आले? हा संशोधनाचा विषय आहे. आरोग्य विभागाच्या या दुर्लक्षामुळे शैलाच्या प्रकृतित मात्र बिघाड झाला आहे.

शैला ही दारिद्रयरेषेखालील परिवारात मोडत असून खालावलेल्या प्रकृतिवर खर्च करण्यासाठी तिच्याकडे पैसे नाहीत. तिच्या आरोग्याला धोका झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी आरोग्य विभागाची राहणार आहे. या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करुन दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी व आपल्याला न्याय द्यावा, अशी मागणी प्रकाश सुखदेवे यांनी सामाजिक न्याय तथा विशेष सहाय्यमंत्री राजकुमार बडोले, आरोग्यमंत्री, खा.नाना पटोले, गोंदियाचे जिल्हाधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी, मुंबई राज्यमहिला आरोगाच्या अध्यक्ष तसेच गोंदिया जि.प.च्या आरोग्य सभापतींकडे केली आहे.