काँग्रेसकडून ‘अच्छे दिन’ची पुण्यतिथी

0
6

मुंबई ता.२3- केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला २६ मे रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. हा दिवस सरकारच्या “अच्छे दिन’ची पुण्यतिथी म्हणून ‘साजरा’ करण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. केंद्रात सत्तेत आल्यापासून मोदींनी जनतेची साफ निराशा केली आहे. सत्तेत येण्यापूर्वी भरमसाठ आश्वासने दिली खरी, पण ती पूर्ण काही केलेली नाही. अच्छे दिनचे आश्वासन कागदावरच राहिले. याचा भंडाफोड करण्यासाठी काँग्रेसकडून हा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शुक्रवारी दिली. २६ मे राेजी राज्यात जोरदार आंदोलन करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

राज्यातून टोल हद्दपार करू, महागाई कमी केली जाईल, पेट्रोल-डिझेलचे दर कमी करून शेतकर्‍यांच्या कृषीमालाला योग्य भाव देऊन त्यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही, अशी आश्वासने मोदींनी लोकसभा निवडणुकीदरम्यान दिली होती. मात्र, त्यातील एकही आश्वासन सत्यात उतरलेले नाही. राज्यात शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करीत असताना सरकार निर्णय घ्यायला तयार नाही. मोदी सरकार सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरले आहे. त्यामुळे मोदी सरकारचे हेच का ते ‘अच्छे दिन’ म्हणून आम्ही या सरकारची पुण्यतिथी साजरी करणार आहोत, असे चव्हाण म्हणाले.