लोकबिरादरीचा प्रयोग राज्यस्तरावर

0
12

गडचिरोली ता.२3- जिल्ह्यातील लोकबिरादरी प्रकल्पाच्या हेमलकसा येथील निवासी आश्रम शाळेने सर्वप्रथम बोलीभाषेतून आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा प्रयोग राबविला होता. त्याचे चांगले परिणाम दिसून आले. या शाळेतील शिक्षकांना सुरुवातीला माडिया भाषेचे शिक्षण देण्यात आले होते. या उपक्रमात ३० मुले सहभागी झाले होते. आता लोकबिरादरी शाळेचा हा प्रयोग राज्यस्तरावर राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आदिवासींचा सर्व व्यवहार हा बोलीभाषेतून होत असला तरी त्यांना अनेक शाळेत मराठीतून शिक्षण दिले जाते. त्यामुळे अनेक विद्यार्थी शाळेत उपस्थित राहण्यास घाबरतात. त्यांना भाषेची अडचण निर्माण होते व काहीजण शाळाही सोडून देतात. राज्यात आदिवासीबहुल भागात भिल्ली, पावरी, मानवची, वार्ली, कातकरी, गोंडी, कोलामी, परधान, कोरकु, नहली अशा विविध भाषा प्रचलित आहे. या भाषांमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण दिल्यास त्यांना विषयाचे आकलन होण्यास मदत होईल व शिक्षणात त्यांची रूची वाढेल. ही बाब लक्षात घेऊन राज्यातील आदिवासी बालकांना इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत बोलीभाषेतून भाषेचे शिक्षण देण्याचा उपक्रम राबविला जाणार आहे. राज्यातील सेवाभावी संस्था, शिक्षक, चित्रकार व विविध क्षेत्रात काम करणारे तज्ज्ञ यांच्या मार्फतीने बोलीभाषेतून शिक्षण देण्यासाठी शैक्षणिक साहित्यांची निर्मिती केली जाणार आहे. पुण्याचा सुमित मोरे हा तरूण गडचिरोली जिल्ह्याच्या हेमलकसा भागात काही काळ वास्तव्याला राहिला. त्याने आदिवासीच्या बोलीभाषेतील अक्षरे अ‍ॅपवर विकसित केली. भामरागड तालुक्यातील बेजुरपल्ली येथे १ जानेवारीला त्याने हा प्रयोग यशस्वी केला. गडचिरोली जिल्ह्यातील मुलांना त्यांच्याच भाषेत शिक्षण देऊन १० गावांमध्ये हा प्रयोग राबविला गेला, अशी माहिती मिळाली आहे. एकूणच यानंतर आता गडचिरोलीसह राज्याच्या विविध भागात आदिवासी विद्यार्थ्यांना बोलीभाषेतून शिक्षण देण्याचा हा प्रयोग राबविला जाणार आहे.

यामुळे अनेक शाळाबाह्य मुलांना शाळेत येऊन ज्ञान ग्रहन करणे शक्य होणार आहे. भामरागड तालुक्यात तीन ते सहा वर्ष वयोगटातील अडीच हजार मुले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर आदिवासी मुलापर्यंत पोहोचणे शक्य नाही. आता बोलीभाषेतून शिक्षण देण्याचा निर्णय झाला. त्यामुळे या विद्यार्थ्यांना याचा व्यापक लाभ होईल, अशी आशा आहे.