वीज ग्राहकांना एलईडी बल्ब देण्याच्या योजनेचा शुभारंभ

0
13

मुंबई दि. २३-राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मुंबईतील विधानभवनात घरगुती वीज ग्राहकांना एलईडी बल्ब देण्याच्या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. या महत्वाकांक्षी योजनेमुळे वीज बिलामुळे ग्राहकांच्या खिशाला लागणारा भुर्दंड कमी होणार असून, विजेच्या वापरातही मोठी बचत होण्यास मदत होणार आहे.
राज्यात सुमारे १ कोटी ७५ लाख घरगुती वीज ग्राहक आहेत. या ग्राहकांना स्वस्त दरात एलईडी बल्ब देण्याची योजना केंद्र सरकारने जाहीर केली होती. या योजनेचा शुभारंभ आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. प्रातिनिधीक स्वरुपात भांडूप परिमंडळातील घरगुती वीज ग्राहकांना एलईडी बल्बचे वाटप मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी केंद्रीय वीज सांसदीय स्थायी समितीचे अध्यक्ष खा.किरीट सोमय्या, आ.राज पुरोहित, अतिरिक्त मुख्य सचिव श्री.मीना, प्रधान सचिव(ऊर्जा) मुकेश खुल्लर, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश गुप्ता, संचालक(प्रकल्प) प्रभाकर शिंदे, संचालक(संचालन) अभिजित देशपांडे, ए.के. अरोरा, दीपक कोकाटे, श्री.शरदचंद्र हे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
घ्ररगुती वीज ग्राहकांना एलईडी बल्ब दिल्यामुळे वार्षिक १३०० दशलक्ष युनिट विजेची बचत होणार असून, कमाल मागणीच्या काळात ५०० मेगावॅट मागणी कमी होण्यास मदत होणार आहे. शिवाय वर्षभरात ग्राहकांची प्रतिबल्ब १८० रुपयांची वीज बिलात बचत होईल, असा विश्वास महावितरणने व्यक्त केला आहे. यापुढे प्रत्येक जिल्हयात स्थानिक लोकप्रतिनिधींच्या हस्ते ग्राहकांना मागणीनुसार एलईडी बल्ब वाटप करण्यात येणार आहे. एसएमएस किंवा ईमेलद्वारे ग्राहक बल्बची मागणी नोंदवू शकतील. घरगुती ग्राहकांना प्रत्येकी ७ मेगावॅट क्षमतेचे २ ते ४ एलईडी बल्ब देण्यात येणार असून, १०० रुपये मासिक हप्त्यात ते उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. खासगी दुकानदाराप्रमाणे ३ वर्षांत बल्ब बिघडल्यास मोफत बल्ब बदलण्याची गॅरंटीदेखील महावितरणने घेतली आहे.