कथित घोटाळ्यासंदर्भात एसीबीचे प्रधान सचिवांना पत्र

0
6

मुंबई दि. २५-राज्याच्या महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांच्या कथित २०६ कोटींच्या गैरव्यवहारासंबंधात लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने गुरुवारी या विभागाच्या प्रधान सचिवांना पत्र पाठवले. २०६ कोटींच्या खरेदी प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागविले आहे.
पंकजा मुंडे यांच्या खात्याने १३ फेब्रुवारी २०१५ या एकाच दिवशी २०६ कोटी रुपयांच्या खरेदीसाठी एकाच दिवशी २४ शासकीय आदेश जारी केले. चिक्की तसेच पुस्तके खरेदीत शासकीय प्रक्रियेचे पालन केले नाही. राज्यातील अंगणवाडय़ांना शैक्षणिक साहित्य, पौष्टिक आहार व अन्य वस्तूंचा पुरवठा करताना महिला व बालविकास विभागाने नियमांचे उल्लंघन केले असून, त्यात आर्थिक फायदा झाल्याचे स्पष्ट होते, असा आरोप कॉंग्रेसने बुधवारी केला. मुंबईत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी या गैरव्यवहारप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. मुंडे यांच्यासह खात्याचे सचिव व अन्य अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणीही त्यांनी केली. त्या पार्श्वभूमीवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने खात्याच्या प्रधान सचिवांकडून स्पष्टीकरण मागवले आहे.