रेल्वेतील सेवांसाठी विद्यापीठांची उभारणी – नरेंद्र मोदी

0
15
वाढदिवसाच्या शुभेच्छा

वृत्तसंस्था
गुुवाहटी (मेघालय) – देशाच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार होण्याची क्षमता रेल्वेत आहे. यामुळे रेल्वेतील सेवा सुधारण्यासाठी या सेवेतील अभ्यासक्रमासाठी देशात रेल्वेची चार विद्यापीठांची उभारणी करणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (शनिवार) केली.

मेंडिपठार ते गुवाहटीदरम्यानच्या नव्या पॅसेंजर रेल्वेला मोदी यांनी हिरवी झेंडी दाखविली. यावेळी ते बोलत होते. मोदी पुढे म्हणाले की, देशाच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य आधारस्तंभ होण्याची क्षमता रेल्वेमध्ये आहे. देशातील रेल्वे सुविधा या शंभर वर्षे जुन्या असून खाजगीकरणाच्या माध्यमातून रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. “रेल्वेचे बहुतेक प्रवासी हे गरीब असल्याने मी दहा ते बारा रेल्वेस्थानकांना विमानतळांपेक्षाही चांगले बनविणार आहे. स्थावर मिळकतीचे भाव वाढलेले असताना, रेल्वेची जागा ही खाजगी हॉटेल्स, रेस्टोरंटस्‌ तसेच अन्य सुविधां देण्याकरिता वापरण्यात येईल. अशा प्रकारे सरकार देशातील सर्व स्थानकांचे आधुनिकीकरण करेल.‘‘ असेही ते पुढे म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, “पूर्वोत्तर राज्यातील पायाभूत सुविधांचा विकास करणे आवश्‍यक असून भारताचा विकास करायचा असेल तर पूर्वोत्तर भागाचा विकास करावा लागेल.‘‘ यावेळी त्यांनी मिझोराममधील भैराबी-साईरंग दरम्याच्या ब्रॉड गेज मार्गाची पायाभरणी केली. ते पुढे म्हणाले की, “आम्ही केवळ एक डबा वाढवून किंवा एका स्थानकाचे आधुनिकीकरण करून समाधानी नाहीत. तर आम्हाला रेल्वेची उभी आडवी प्रगती करायची आहे. जी भारताच्या अर्थव्यवस्थेचे इंजिन ठरेल.‘‘ मोदींनी रेल्वेच्या आधुनिकिकरणासाठी यापूर्वीच शंभर टक्के विदेशी गुंतवणूकीची परवानगी दिलेली आहे. रेल्वेचा प्रवास हा पर्यावरणपूरक असून त्या माध्यमातून भारतातील जागतिक तापमानवाढ नियंत्रणात ठेवता येणे शक्‍य असल्याचेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी दक्षिण कोरियातील चांगल्या रेल्वेचे उदाहरण देत रेल्वेच्या क्षमतावृद्धीसाठी रेल्वेची देशांतर्गत जोडणी महत्वाची असल्याचेही सांगितले.