मुंबई – सत्तेसाठी आतूर शिवसेनेला मानगूट धरून मनसोक्त फरफटवल्यावर आता भाजपाने पुन्हा चर्चा सुरू केली आहे. इतका अपमान केल्यानंतरही शिवसेना नेतृत्वाने मांडीला मांडी लावून बसण्याची लाचारी दाखवल्यामुळे सामान्य शिवसैनिक मात्र अस्वस्थ झाला आहे.
मंत्रीपद आणि महामंडळाची आशा असणारे २२-२३ आमदार सत्तेत जाण्यासाठी उतावीळ झाले आहेत. तर विरोधी बाकांवर बसून शिवसेना बळकट करावी, असे मत सामान्य शिवसैनिक आणि काही आमदारांचे आहे. शिवसेनेतीलच या दुफळीने शिवसेनेचे नेतृत्व पार गोंधळून गेले आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर भाजपाने शिवसेनेचा वारंवार अपमान केला आहे. महाराष्ट्रात भाजपाने शिवसेनेच्या जीवावर आपली ताकद निर्माण केली. आता तेच आमच्या जीवावर उठले आहेत. भाजपाच्या सरकारमध्ये सामील झाल्यास ते आपली ताकद संपवून टाकतील. म्हणून शिवसेनेच्या नेतृत्वाने शिवसैनिकांशी चर्चा करूनच भाजपाशी वाटाघाटी कराव्यात, अशी मागणी आता सामान्य शिवसैनिक करीत आहेत.
याच गोंधळलेल्या अवस्थेच चर्चेचा पहिला अंक शुक्रवारी ‘मातोश्री’वर झाला. केंद्रीय मंत्री धर्मेद्र प्रधान, राज्याचे सहकारमंत्री चंद्रकांत पाटील अशा दुय्यम नेत्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. अपेक्षेप्रमाणे त्यात कोणताही ठोस निर्णय न होता चेंडू दिल्ली दरबारी टोलवण्यात आला.
विधानसभा निवडणुकांमध्ये एकमेकांच्या विरोधात लढताना आरोपांच्या फैरी झाडणारे शिवसेना-भाजपा पुन्हा एकत्र येण्यासाठी प्रयत्नशील झाले आहे. भाजपाला सर्वाधिक जागा मिळालेल्या असल्या तरी सत्ता स्थापन करण्याएवढे संख्याबळ त्यांच्याकडे नाही. आवाजी मताने विश्वासदर्शक ठराव पास करून घेत भाजपाने सरकार वाचविले असले तरी अल्पमतातील भाजपा सरकारवर सर्व बाजूने जोरदार टीका झाली.
राष्ट्रवादीने पाठिंबा दिलेला असला तरी त्यांचा पाठिंबा घेतल्याने मतदारांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटली. त्यांना टाळूनही भाजपाने राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर सरकार चालविले असते, मात्र शरद पवार कोणत्या वेळी दगा देतील याचा भरोसा नसल्याने भाजपाने पुन्हा शिवसेनेला गोंजारण्यास सुरुवात केली आहे.
गुरुवारीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा नव्याने चर्चेचे संकेत देत असताना ‘‘सहकार मंत्री चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय मंत्री धर्मेद्र प्रधान यांना चर्चेचे अधिकार दिले आहेत’’ असे सांगितले होते. मात्र या ‘अधिका-यांनी’ केवळ चर्चेचे नाटक पार पाडले.
विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात विरोधी बाकावर बसलेल्या शिवसेनेने विरोधी पक्षनेतेपदही पदरात पाडून घेतले. आता सरकारच्या विरोधात लढायला आम्ही सज्ज झालो आहोत, असे दाखविण्यासाठी विरोधी पक्षनेते एकनाथ शिंदे आणि भाजपाच्या आमदारांनी
सत्तेवर लाथ मारून स्वाभिमानाने विरोधी पक्षात बसावे आणि भाजपाला त्याची जागा दाखवावी अशी भावना शिवसैनिकांमध्ये आणि काही आमदारांमध्ये आहे. तर सहा कॅबिनेट आणि चार राज्य मंत्रीपदांची आस शिवसेनेला लागली आहे. तशी मागणीही शिवसेनेने वारंवार केली आहे. भाजपाने जी देऊ ती चार कॅबिनेट आणि सहा राज्यमंत्रीपदे घ्या असा प्रस्ताव दिला आहे.