नांदेड येथे कार्यालय प्रमुख आणि तक्रारदार यांची समोरासमोर सुनावणी;जिल्हाधिकार्‍यांचा आगळावेगळा उपक्रम

0
8

नांदेड – प्रजासत्ताक आणि स्वातंत्र्य दिन यांसारख्या राष्ट्रीय सणांच्या अनुषंगाने अनेकदा तक्रारदार आंदोलन करतात. बर्‍याचदा काही ठिकाणी आत्मदहन करण्यासारखे प्रकारही घडतात. त्यामुळे या सर्व घटना लक्षात घेता नांदेडच्या जिल्हाधिकार्‍यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात तात्काळ ‘तक्रार निवारण’ सभा आयोजित केली होती. प्रत्यक्ष कार्यालय प्रमुख आणि अर्जदार यांची समोरासमोर सुनावणी घेत तक्रारींचा तात्काळ निपटारा केला आहे. जिल्हाधिकार्‍यांच्या आगळ्यावेगळ्या उपक्रमाची सर्वत्र चर्चा होत असून त्यांचे कौतुकही होत आहे.

१. या वेळी प्राप्त आणि विभागीय आयुक्त कार्यालय संभाजीनगर येथील उपोषणाच्या संदर्भाने आलेले ५ अर्ज, जिल्हाधिकारी स्तरावरील २७ अर्ज, नांदेड जिल्ह्यातील आत्मदहन संदर्भाने आलेले ३३ अर्ज आणि नांदेड शहरातील ७ आंदोलनाच्या अर्जाविषयी सुनावणी घेण्यात आली. यासाठी सर्व विभागप्रमुखांना जिल्हाधिकारी कार्यालयाने बोलावले होते.

२. प्रत्यक्ष कार्यालय प्रमुख आणि अर्जदार यांची समोरासमोर सुनावणी झाल्यामुळे जलदगतीने निपटारा झाला. काही प्रकरणात संबंधित प्राधिकरणाविषयी काही तक्रार असल्यास संबंधित प्राधिकरणाच्या वरिष्ठ कार्यालयाकडे अपील सादर केले जाऊ शकते, असे अभिजित राऊत यांनी निर्देशित केले.

३. मोर्चा, धरणे, उपोषण आणि आमरण उपोषण हे प्रजासत्ताकदिन अन् स्वातंत्र्यदिन यांसारख्या राष्ट्रीय सणांच्या अनुषंगाने अपेक्षित नाहीत. एकप्रकारे या राष्ट्रीय सणांचा अवमान केल्याचेच हे द्योतक आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्यात लागू असलेली आचारसंहिता आणि जमावबंदी लक्षात घेता तक्रारदारांनी कोणत्याही प्रकारचे असंवैधानिक मार्ग अवलंबवल्यास संबंधितांविरुद्ध लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ अंतर्गत कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी चेतावणी येथील जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली आहे.