शेती आणि पायाभूत क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी एसएमबीसीने पुढाकार घ्यावा – मुख्यमंत्री

0
9

मुंबई, दि. 25 :  महाराष्ट्रात गुंतवणुकीच्या अनेक संधी उपलब्ध असल्याने
एसएमबीसीने (सुमीतोमो मितसुई बँकिंग कॉर्पोरेशन) महाराष्ट्रात शेती आणि
पायाभूत क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसएमबीसीच्या शिष्टमंडळाला केले.

एसएमबीसीचे मॅनेजिंग डायरेक्टर सोसुके मोरी यांच्यासह शिष्टमंडळाने आज
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘वर्षा’ निवासस्थानी भेट घेतली.
यावेळी खासदार पूनम महाजन, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय उपस्थित होते. या
शिष्टमंडळात एसएमबीसीचे राष्ट्रीय अध्यक्ष भारत कौशल,  एसएमबीसीच्या नवी
दिल्लीचे शाखा व्यवस्थापक एच. ककीता,  के. इरिझावा, के. युई यांचा समावेश
होता.

शिष्टमंडळासमवेत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की,
आगामी काळात शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होणे आवश्यक आहे.
यासाठी एसएमबीसीने पुढाकार घेण्याची गरज आहे. आज वेगवेगळया शहरांमध्ये
पायाभूत सुविधांचे जाळे विकसित करण्यात येत असताना, या क्षेत्रातही
एसएमबीसीनेही पुढे यावे अशी अपेक्षा श्री. फडणवीस यांनी यावेळी व्यक्त
केली. महाराष्ट्रातील पाच हजार गावांसाठी जागतिक बँकेमार्फत मदत
मिळविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. गावांच्या विकासासाठी नवीन तंत्रज्ञान,
एकात्मिक आणि नियोजनबध्द आराखडे आणि शेतीमधील वेगवेगळे प्रयोग या सर्वच
क्षेत्रात एसएमबीसीने पुढाकार घ्यावा आणि महाराष्ट्राबरोबर काम करावे,
अशी अपेक्षाही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी उपस्थित
शिष्टमंडळाकडे व्यक्त केली.