सर्वोच्च न्यायालयाकडून निबर्ंधांवरील याचिकेवर सुनावणीवेळी निर्देश
धुळे – धुळे महापालिकेची रखडलेली निवडणुक लवकरच जाहिर होण्याचे संकेत सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीमुळे प्राप्त झाले असून धुळ्यासह राज्यातील विविध महापालिका निवडणुकीचा मार्ग मोकळा होणार अशी शक्यता वर्तवली जात आहे. विधानसभा निवडणुकीनंतर आता सर्वांचे लक्ष महापालिकेकडे लागले आहे.
गेल्या वर्षभरापासून धुळे महापालिकेवर प्रशासकाचा कारभार असून निवडणुका लागलेल्या नाहित. त्याचप्रमाणे दोंडाईचा, शिरपूर नगरपालिकेच्या निवडणुकाही रखडलेल्या आहेत. राज्यातील मुंबई, नाशिक, पुणे अशा विविध महापलिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. त्यामुळे या निवडणुका लवकरात लवकर व्हाव्या अशी मागणी माजी नगरसेवकांसह नागरीक देखील करीत आहेत.
गेली तीन ते साडेतीन वर्षांपासून रखडलेल्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. निवडणुका घेण्यावर असलेल्या निर्बंधांसंदर्भात समाधानकारक कारण नसेल तर निवडणुका घेण्याचे निर्देश देण्यात येतील, अशी महत्वपूर्ण टिपण्णी सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भातील एका सुनावणीत केली असल्याचे म्हटले जाते आहे. यांस मात्र अधिकृत दुजोरा नाही.
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरील निर्बंध उठविण्यासाठी ’ईशाद’ या ’एनजीओ’कडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टाने हे महत्वपूर्ण टिपण्णी केली आहे. राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही एका मुलाखतीत यासंदर्भात भाष्य केले होते.याचा संदर्भ या वृतात देण्यात आला आहे.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात महत्वपूर्ण आदेश दिल्याने या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा होणार आहे, त्यामुळे महाराष्ट्रासह इतर राज्यांतीलही महानगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, नगरपरिषदा आदींच्या निवडणुका होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
ईशाद या संस्थेच्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने राज्यनिहाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित असणार्या कारणांचे वर्गीकरण करण्याचे निर्देश आहेत. प्रत्येक राज्यातील कारणमीमांसा आणि परिस्थिती वेगळी आहे, अशी टिपण्णीही सर्वोच्च न्यायालयाने केली आहे.