मार्केटिंग, कॉल सेंटर क्षेत्रात मराठीचा आग्रह धरा

0
16

ठाणे : मराठीच्या मुद्यावर एकमेवाधिकार गाजवणाऱ्या शिवसेनेसोबत आता भाजपच्याही अजेंड्यावर मराठीचा मुद्दा आला आहे. मार्केटिंग, कॉल सेंटर अशा क्षेत्रात मराठीचा आग्रह धरल्यास, भविष्यात या क्षेत्रात केवळ मराठी येणाऱ्यांनाच नोकऱ्या मिळतील असा विश्वास शिक्षण आणि मराठी भाषा संवर्धन मंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केला. तसंच येत्या 27 फेब्रूवारीच्या आत मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्याचं आश्वासनही विनोद तावडे यांनी दिलं.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं 13 वं संमेलन आज मुंबईत पार पडलं. यावेळी तावडे बोलत होते. दुकानाच्या पाट्या मराठीतून लावा, असा आग्रह अनेकांकडून होतो. मात्र दुकानाचा मालक मराठी असावा, असं फार थोड्या लोकांना वाटतं, असा टोलाही त्यांनी यावेळी मनसेला लगावला.

विधासभेवेळी मराठी अस्मितेच्या मुद्यावरुन शिवसेनेनं भाजपाविरोधात रान उठवलं होतं. त्यामुळे निवडणुकीनंतर आता भाजपानं मराठी मुद्याबाबत सौम्यच नाही तर पुढाकाराची भूमिका घेतली आहे.

त्यामुळे भाजपाचा हा मराठी अंजेडा आगामी मुंबई महापालिका निवडणुकांची पूर्वतयारी तर नाही ना? अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे.