नवी दिल्ली-घर वापसीच्या नावाखाली सुरू झालेले धर्मांतरण आणि योगी आदित्यनाथ यांनी बाबरी मशीद पाडण्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विषयावरून राज्यसभेत विरोधकांनी सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच निवेदन करावे, अशी मागणी विरोधकांनी एकमताने केल्यामुळे राज्यसभेचे कामकाज सोमवारी तहकूब करावे लागले.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे खासदार सीताराम येचुरी म्हणाले, केंद्रीय मंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल मोदी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतरही राज्यघटनेची धर्मनिरपेक्षतेची चौकट मोडण्यासाठी भाजपच्या खासदारांमध्ये जणू स्पर्धाच सुरू आहे. त्यामुळे या विषयावर मोदी यांच्या उपस्थितीत राज्यसभेमध्ये चर्चाच व्हायला हवी. वादग्रस्त वक्तव्ये करून भाजपचे खासदार वातावरण गढूळ करीत असल्याची टीकाही त्यांनी केली.
मोदी यांनी या चर्चेनंतर संबंधितांवर कारवाई केली पाहिजे. त्याचबरोबर भविष्यात असा प्रकार होणार नाही, याचे आश्वासनही त्यांनी सभागृहाला दिले पाहिजे, अशीही मागणी येचुरी यांनी केली.
१९९२ मध्ये बाबरी मशीद पाडण्यात आली, त्यावेळी हिंदूंचे ऐक्य बघायला मिळाले होते असे सांगत आदित्यनाथ यांनी बळजबरीने परधर्मात गेलेले नागरिक ‘घर वापसी’च्या निमित्ताने परत येणार असतील, तर त्यामध्ये केंद्र सरकारने हस्तक्षेप करू नये, अशी मागणी केली होती. त्यांच्या याच वक्तव्यावरून राज्यसभेत विरोधकांनी केंद्र सरकारवर टीका केली