24.4 C
Gondiā
Saturday, August 22, 2026
Home मराठवाडा/खान्देश सजग ग्राहकच सुरक्षित ग्राहक – जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

सजग ग्राहकच सुरक्षित ग्राहक – जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

0
26
परभणी दि. 23: नागरिकांनी खरेदी करताना सतर्कता बाळगावी, प्रत्येक व्यवहारात पारदर्शकता ठेवावी आणि आपले ग्राहक हक्क जाणून त्यांचा योग्य वापर करावा. अन्याय झाल्यास तक्रार नोंदविण्यास मागे न राहता, जागरूक ग्राहक बनून सशक्त समाज घडविण्यास हातभार लावावा. सजग ग्राहक हाच सुरक्षित ग्राहक असतो, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले.
जागतिक ग्राहक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आज कार्यक्रम संपन्न झाला. त्यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी बोलत होते. अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव भूषण काळे, जिल्हा पुरवठा अधिकारी विलास मुसळे, अखिल भारतीय ग्राहक मंच देवगिरी प्रांताचे अध्यक्ष विलास मोरे, ग्राहक मंचाचे सदस्य गोविंद देशमुख, आर्थिक साक्षरता सल्लागार श्री. हट्टेकर तसेच शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
अध्यक्षीय भाषणात जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी ग्राहकांनी नेहमी सजग व जागरूक राहण्याचे आवाहन केले. खरेदी करताना वारंटी व गॅरंटी यातील फरक समजून घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. वस्तू खरेदी करताना बिल घेणे, त्यावर जीएसटी क्रमांक तपासणे, तसेच वस्तूवरील मानांकन, स्टार रेटिंग आणि वीज वापर याची माहिती जाणून घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विद्यार्थी हे देशाचे भविष्य असून ते ग्राहक व उत्पादक या दोन्ही भूमिका निभावतात, त्यामुळे प्रामाणिकपणा व योग्य वर्तन आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच त्यांनी भारतातील ग्राहक चळवळीचा इतिहास सांगताना बिंदू माधव जोशी यांनी उभारलेल्या चळवळीमुळे १९८६ चा ग्राहक संरक्षण कायदा अस्तित्वात आला, असे सांगितले. तक्रार निवारण यंत्रणेची माहिती प्रत्येक नागरिकाला असणे गरजेचे असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव भूषण काळे यांनी मनोगतात विधी सेवा प्राधिकरणामार्फत विनामूल्य कायदेशीर सल्ला दिला जातो, याचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले. त्यांनी ग्राहक संरक्षण कायदा 1986 व 2019 मधील तरतुदींचे महत्त्व स्पष्ट केले.
प्रास्ताविक जिल्हा पुरवठा अधिकारी विलास मुसळे यांनी केले. बदलत्या तंत्रज्ञानाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांनी आपल्या हक्कांची जाणीव ठेवून योग्य पद्धतीने तक्रार नोंदवावी, असे त्यांनी सांगितले.
आर्थिक साक्षरता सल्लागार श्री. हट्टेकर यांनी डिजिटल फसवणुकीबाबत जागरूक राहण्याचे आवाहन करत कोणालाही ओटीपी किंवा संशयास्पद लिंक शेअर करू नये, असे सांगितले. ग्राहक मंचाचे सदस्य गोविंद देशमुख यांनी 1915 हा टोल-फ्री क्रमांक सेव्ह करून तक्रार नोंदवण्याचे मार्गदर्शन केले, तसेच ऑनलाइन तक्रार प्रक्रियेची माहिती दिली.
अखिल भारतीय ग्राहक मंच देवगिरी प्रातांचे अध्यक्ष विलास मोरे यांनी ग्राहक चळवळीचा इतिहास प्रभावी शैलीत मांडत 1972 च्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ग्राहक संरक्षण कायद्याचे महत्त्व अधोरेखित केले. 1986 व 2019 च्या कायद्यातील बदलही त्यांनी थोडक्यात स्पष्ट केले.
कादंबरीकार राजेंद्र गहाळ यांनी आपल्या विनोदी शैलीत ग्राहक संरक्षण कायद्याचे महत्त्व स्पष्ट केले. पर्यावरण प्रमुख संगीता अवचार यांनी वाढते प्रदूषण आणि पर्यावरण संरक्षणाची गरज याकडे लक्ष वेधले. कार्यक्रमाच्या प्रारंभी श्री. वायकोस यांनी ग्राहक संरक्षण कायद्याविषयी प्रश्नमंजुषा घेऊन उपस्थितांना मार्गदर्शन केले.