■ ऊस देयकबाबत कारखानादारांची अनास्था, शेतकरी उद्दिग्न
बीड– जिल्ह्यातील तसेच सीमावर्ती भागात असलेल्या साखर कारखाने गाळप हंगाम 2025-26 मध्ये ऊस गाळप करून तीन महिन्याचा कालावधी उलटला तरी ऊस देयक अदा केली नसल्याने गुरुवार दि. 9 रोजी ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने कारखाना प्रशासनाची भेट घेत बाजू मांडली असता कारखानदार ऊस देयक अदा करण्यात उदासीन असल्याने येत्या काळात शेतकरी साखर कारखानदाराच्या घराला घेणार घालणार असल्याची माहिती संघर्ष समितीने दिली.
ऊस दरवाढ बाबत ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समिती युवा शेतकरी संघर्स समिती मागील अनेक दिवसापासून निदर्शने, आंदोलने करत मोठ्या संघर्षानंतर कारखान्यांनी ऊस दर जाहीर करून शेतकऱ्यांकडून ऊस गाळपासाठी नेला. मात्र, तीन महिन्यांपासून गाळप करण्यात आलेल्या उसाचे बिल अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले नाही. नियमांनुसार ऊस गाळप झाल्यानंतर १५ दिवसांत देयक अदा करणे बंधनकारक असताना जिल्ह्यातील व जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात असलेल्या साखर कारखान्यानी कोट्यावधी रुपयांचे ऊस देयक थकीत ठेवले. जिल्ह्यातील काही साखर कारखान्याने जानेवारी फेब्रुवारी अखेर काही प्रमाणात देयके अदा केली मात्र काही कारखान्याचे डिसेंबर मध्ये गाळप झालेल्या ऊसाची देयके थकीत असल्याने या प्रश्नी संघर्ष समितीने नांदेड येथील उपसंचालक कार्यालयासमोर दि 25 मार्च रोजी आक्रमक पवित्रा घेत आंदोलन केले. या आंदोलनाची दखल घेत साखर सह संचालकांनी नांदेड परीक्षेतील सर्वच साखर कारखाने यांना गाळप हंगाम २०२५-२६ च्या थकीत ऊसाचे देयक तात्काळ अदा करण्यात यावी अन्यथा ज्या कारखान्यांनी १४ दिवसाचे कालावधीत एफआरपी देयके अदा केलेली नाहीत अशा कारखान्याकडून कलम ३ (३A) अनुसार विलंब कालावधी करिता १५ टक्के प्रमाणे होणारे व्याज आकारणी करुन आपले विरुध्द मा. साखर आयुक्त, म. रा. पुणे यांना आर.आर.सी. ची कार्यावाही करणेची शिफारस करण्यात येईल अशी नोटीस बजावली. या नोटीसीला देखील मुजोर साखर सम्राटांनी न जुमानता ऊस देयक अदा न केल्याने गुरुवार दि 9 रोजी संघर्ष समितीने सनदशीर मार्गाने ओंकार साखर कारखाना, 21 शुगर सायखेडा, योगेश्वरी शुगर लिंबा, एनएसएल शुगर, छत्रपती सहकार्य साखर कारखाना व लोकनेते सुंदरराव सोळंके सह.साखर कारखाना येथील कारखाना प्रशासनाची भेट घेत निवेदने दिली. लवकर थकीत ऊस देयक अदा न केल्यास साखर कारखान्यांना किंवा मालकांच्या घराला घेराव घालण्याचा इशारा यावेळी संघर्ष समितीने दिला.





