27.3 C
Gondiā
Tuesday, June 30, 2026
Home मराठवाडा/खान्देश माजलगावात तीन लाचखोर जालना एसीबीच्या जाळ्यात

माजलगावात तीन लाचखोर जालना एसीबीच्या जाळ्यात

0
14

बीड — जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांमधील लाचखोरीला आळा घालण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केली आहे. माजलगाव येथील सहाय्यक निबंधक कार्यालयातील दोन अधिकारी आणि एका खाजगी व्यक्तीला १३ हजार रुपयांची लाच स्वीकारताना जालना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे सहकार विभागात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, माजलगाव येथील एका नागरिकाने सावकारकीचा अधिकृत परवाना मिळवण्यासाठी सहाय्यक निबंधक कार्यालयात अर्ज केला होता. मात्र, परवाना मंजूर करून देण्यासाठी मुख्य सहाय्यक निबंधक सुरज जगदाळे आणि कार्यालयीन अधीक्षक सतीश शेरखाने यांनी एका खाजगी हस्तकाच्या माध्यमातून संबंधित नागरिकाकडे २५ हजार रुपयांची लाच मागितली होती.
लाच देण्याची इच्छा नसलेल्या तक्रारदाराने याबाबत जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या पथकाने माजलगाव सहाय्यक निबंधक कार्यालयात सापळा रचला.
मंगळवारी ३० जून २०२६ रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास तक्रारदाराकडून १३ हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना मुख्य सहाय्यक निबंधक, कार्यालयीन अधीक्षक आणि त्यांच्या खाजगी हस्तक सुरज फपाळ या तिघा जणांना एसीबीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले.
या कारवाईत लाचेची रक्कम जप्त करण्यात आली असून संबंधित तिघांविरुद्ध पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. शासकीय कार्यालयात लाच मागणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे.