छत्रपती संभाजीनगर : १०० रुपयांचा बॉण्ड(स्टॅम्प पेपर,मुद्रांक शुल्क) १२० रुपयांत विकणारी लाचखोर बॉण्ड विक्रेती शैला शशिकांत बोऱ्हाडे (रा. मीनाताई ठाकरे मार्केट, महाराणा प्रताप चौक, बजाजनगर, वाळूज एमआयडीसी) हिला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने आज, १० जुलैला सकाळी साडेदहाच्या सुमारास वाळूज एमआयडीसीतील महाराणा प्रताप चौकात रंगेहात पकडले.शैला बोऱ्हाडे हिने ७ बॉण्डसाठी(स्टॅम्प पेपर,मुद्रांक शुल्क) एकूण १४० रुपये जास्त घेताच एसीबी पथकाने ताब्यात घेतले. तिच्याविरुद्ध एसीबीचे पोलीस निरीक्षक अमोल सोनवणे यांच्या तक्रारीवरून वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात सायंकाळी सहाच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसीबी सूत्रांच्या माहितीनुसार, वाळूज महानगरातील एका सामाजिक कार्यकर्तीला स्वतःच्या संस्था नोंदणीसाठी सभासदांचे शपथपत्र तयार करायला ७ कोरे बॉण्ड विकत घ्यायचे होते. त्यासाठी त्या गुरुवारी (९ जुलै) सायंकाळी पाचच्या सुमारास महाराणा प्रताप चौकातील बॉण्ड विक्री केंद्रावर गेल्या. त्यावेळी प्रत्येक बॉण्डची अधिकृत किंमत १०० रुपये असतानाही शैला बोऱ्हाडे प्रत्येक बॉण्डमागे (स्टॅम्प पेपर,मुद्रांक शुल्क) जास्तीचे २० रुपये मागत होती.
जास्तीचे पैसे देण्याची इच्छा नसल्याने सामाजिक कार्यकर्तीने ‘एसीबी’कडे धाव घेतली. एसीबी पथकाने तक्रारीची शहनिशा करण्यात आल्यानंतर आज सकाळी १० ला सापळा रचला. सकाळी साडेदहाच्या सुमारास या सापळ्यात ७ बॉण्डसाठी एकूण १४० जास्तीचे घेताच ठरल्यानुसार सामाजिक कार्यकर्तीने पूर्वनियोजित इशारा म्हणून साडीचा पदर उलटा खांद्यावर टाकला. त्याचबरोबर ‘एसीबी’ पथकाने शैला बोऱ्हाडे हिला रंगेहात पकडले. पथकाने जादा वसूल केलेले पैसे, बॉण्ड आणि इतर साहित्य जप्त केले. शीला बोऱ्हाडे हिला ताब्यात घेऊन वाळूज एमआयडीसी पोलिसांच्या स्वाधीन केले.




