नवी दिल्ली: एक, दोन आणि पाच रूपयांची नाणी चलनात आल्यानंतर भारत सरकारने एक रूपयाच्या नोटेची छपाई नोव्हेंबर 1994 पासून बंद केली होती. याशिवाय दोन रूपये, पाच रूपयांच्या नोटांची छपाईदेखील 1995 पासून बंद केली होती. मात्र आता एक रूपयांच्या नोटांची छपाई पुन्हा एकदा सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
अर्थमंत्रालयाने याबाबतची अधिसूचना काढली आहे. या एक रूपयाच्या नोटेवर वित्त सचिव राजीव महर्षि यांचं हस्ताक्षर असणार आहे. या नोटेच्या वरच्या भागावर भारत सरकार असं छापण्यात येणार आहे. तसंच या नोटेचा आकार 9.7 x 6.3 सेंटीमीटर इतका असणार आहे.
अधिसुचनेनुसार नोटेचा पुढचा भाग गुलाबी आणि हिरव्या रंगाच्या मिश्रणाचा आहे. यावर हिंदी किंवा इंग्रजी भाषेत वित्त सचिवांची सही असणार आहे. तसंच भारत सरकार असा शब्द आणि त्यावर 1 रूपयाचं चिन्ह असणार आहे.
या नोटेच्या मागील भागावर इंग्रजीमध्ये गवर्नमेंट ऑफ इंडिया आणि हिंदीमध्ये भारत सरकार असं लिहिण्यात येणार आहे. तसंच याच्या डिझाइनमध्ये तेल शोधणाऱ्या प्लॅटफॉर्म समुद्र सम्राटाचा फोटो आणि 15 भारतीय भाषांमध्ये एक नोट लिहिलेली असणार आहे.