पाथरीला देशात आदर्श बनविणार-खा.प्रफुल पटेलांची ग्वाही

0
27

गोंदिया-पाथरी या गावात सर्व जाती-धर्माचे लोक गुण्यागोविंदाने एकत्र राहतात. आदर्श ग्राम निर्मितीसाठी पाथरीवासियांचे सहकार्य आवश्यक आहे. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करुन पाथरी हे गांव देशात आदर्श बनविणार असल्याची ग्वाही राज्यसभा सदस्य खा.प्रफुल पटेल यांनी दिली.
आज (ता.२८) गोरेगाव तालुक्यातील पाथरी येथे सांसद आदर्श ग्राम योजनेअंतर्गत आयोजित कार्यक्रमात खा.प्रफुल पटेल बोलत होते.
यावेळी आ.राजेंद्र जैन, जिल्हाधिकारी डॉ.अमित सैनी, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश शिंदे, उपवनसंरक्षक जितेंद्र रामगावकर, माजी आ.मधुकरराव कुकडे, भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे, गंगाधर परशुरामकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
पाथरी हे गांव ४ हजार लोकसंख्येचे असून गावात ७०० कुटुंब वास्तव्यास आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सांसद आदर्श ग्राम योजना सुरु केली आहे. याचाच एक भाग म्हणून खा.प्रफुल पटेल यांनी पाथरी हे गाव विकासाकरीता दत्तक घेतले आहे.
खा.पटेल पुढे म्हणाले, पाथरी ग्रामस्थांच्या अडी-अडचणी समजून घेणे महत्वाचे आहे. गावाच्या विकासाच्या दृष्टीने पाथरी ग्रामस्थांनी विकास आराखडा तयार करावा. आदर्श ग्राम निमिर्तीसाठी ग्रामस्थांचा सहभाग व सहकार्य आवश्यक असून त्याशिवाय गांव आदर्श बनू शकत नाही.
पाथरी हे गांव केवळ स्वच्छ आणि सूंदर बनवून चालणार नाही असे सांगून खा.पटेल म्हणाले, ग्रामस्थांचे आर्थिकदृट्या बळकटीकरण करण्याचाही आपला प्रयत्न आहे. गावाच्या विकासाच्या दृष्टीने ग्रामस्थांनी आपली मानसिकता बदलविली पाहिजे. गावातील शेतकऱ्यांनी केवळ खरीप पिके न घेता रब्बी पिके सूद्धा घ्यावी. यासाठी कृषी विभागाचे मागदर्शन घ्यावे. गावातील महिला बचत गटांना वेगळी दिशा देवून त्यांना आदर्श बनविणार असल्याचे खा.पटेल यांनी सांगितले.
खा.पटेल पुढे म्हणाले, गावातील युवकांना गावातच रोजगार उपलब्ध करुन देण्यात येईल. गावातील कामे गुणवत्तापूर्ण होतील याकडे आपले लक्ष राहणार असल्याचे सांगून ते म्हणाले, गावाच्या विकासासाठी सिंचन, रोजगार, शिक्षण आणि आरोग्याचे दृष्टीने काम करण्यात येईल. पाथरी प्रकल्पग्रस्थांचे प्रश्न सोडविण्यात येतील. गावाच्या सर्वांगिण विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही खा.पटेलांनी यावेळी दिली.
जिल्हाधिकारी डॉ.सैनी म्हणाले, पाथरी हे गांव केवळ आदर्शच नाही तर पुरस्काराने सन्मानीत होईल असे काम ग्रामस्थांनी करावे. ग्रामसभेच्या माध्यमातून गावाच्या विकासासाठी प्रयत्नशील असल्याचे जिल्हाधिकारी डॉ.सैनी यांनी सांगितले.
पाथरी प्रकल्पग्रस्थांचे प्रश्न सोडविणार असल्याचे सांगून डॉ.सैनी म्हणाले, गावातील शेतकऱ्यांनी दोन्ही हंगामात पिके घ्यावीत. त्यामुळे आर्थिक परिस्थिती सुधारण्यास निश्चितच मदत होईल. पाथरी ग्रामस्थांना गावाच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
प्रारंभी मान्यवरांचे ग्रामपंचायत कार्यालयात आगमन होताच सरपंच आशा खांडवाये, उपसरपंच इश्वरदास राऊतकर, ग्रामसेवक सी.ए.रहांगडाले व ग्रामपंचायत सदस्यांनी स्वागत केले. मान्यवरांनी महात्मा गांधी व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करुन पुष्पहार अर्पण केले. खा.पटेल यांनी ग्रामपंचायत कार्यालय परिसरात वृक्षारोपण केले.
सभेला विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तहसिलदार शिल्पा सोनाळे, गटविकास अधिकारी एस.के.चव्हाण, सरपंच आशा खांडवाये, उपसरपंच इश्वरदास राऊत, सचिव सी.ए.रहांगडाले आणि सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाला पाथरी ग्रामस्थांची बहुसंख्येने उपस्थिती होती. प्रास्ताविक केवल बघेले यांनी केले. संचालन सी.ए.रहांगडाले यांनी केले, उपस्थितांचे आभार मुलचंद खांडवाये यांनी मानले.