बाजारात येऊ शकते 25 रुपयांची नोट

0
15

चंडीगड – बाजारात तुम्हाला आता लवकरच 25 रुपयांची नोट पाहायला मिळण्याची शक्यता आहे. तसे झाले तर त्याचे श्रेय चंदीगडच्या एका व्यापा-याला मिळू शकते. चंदीगडचे राम दास सिंगला यांनी पंतप्रधानांना 25 रुपयांची नोट चलनात आणण्याचा सल्ला दिला होता. विशेष म्हणजे मोदींना हा प्रस्ताव आवडल्याचे सांगितले जात आहे.

पंतप्रधान कार्यालयाने हा प्रस्ताव अंमलात आणण्याची प्रक्रिया सुरू केली असल्याचेही म्हटले आहे. दरम्यान सिंगला यांचा हा सल्ला सोमवारी सकाळी 9.50 वाजता आकाशवाणीवर प्रसारीत केला जाणार आहे. आकाशवाणीने त्यासाठी सिंगला यांचा संदेश रेकॉर्डही केला आहे.

सेक्टर-26 च्या ग्रेन मार्केटमध्ये 1975 पासून व्यवसाय करणारे सिंगला यांनी सांगितले की, मी रेडिओवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘मन की बात’ हा कार्यक्रम ऐकला. कार्यक्रमात पंतप्रधान म्हणाले होते की, सामान्य नागरिकांनीही त्यांच्या मनात जे असावे ते शेअर करायला हरकत नाही. मी ब-याच दिवसांपासून पाच रुपयांचे नाणे सहज न मिळण्याच्या समस्येला तोंड देत होतो.

माझ्या सारखेच कोट्यवधी लोक रोज अशा त्रासाला सामोरे जातात. त्यामुळे मी आकाशवाणीला माझा प्रस्ताव पाठवला होता. त्यावर एक जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता पंतप्रधान कार्यालयातून मला फोन आला. मी पाठवलेला प्रस्ताव आवड्याचे मला सांगण्यात आले. यासंदर्भातील शक्यतेसाठी त्यांनी आरबीआयला दिशानिर्देश दिल्याचेही त्यांनी सांगितले.

नेमकी आयडिया
सिंगला यांच्या मते, पाच रुपयांच्या नाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी पंचवीस रुपयांच्या नोटचा वापर करता येईल. त्यामुले सरकारला हवी असल्यास 20 रुपयांची नोट बंदही करता येईल. त्याला 25 रुपयांची नोट पर्याय ठरू शकते. उदाहरणार्थ एखाद्याला 15 रुपये द्यायचे असतील तर त्याला 25 रुपयांची नोट देऊन 10 रुपये परत घेता येऊ शकतात. त्याचप्रमाणे एखाद्याला पस्तीस रुपये द्यायचे असतील तर 25 आणि 10 रुपयांची नोट देता येऊ शकेल. त्याला पाच रुपयांची नोट द्यायची गरज पडणार नाही. त्यामुळे सुट्या पैशांची समस्या दूर होऊ शकेल.