कर्जवाटपात नागपूरचा वाटा ५0 टक्के : डॉ. सुखदेवे

0
12

नागपूर,दि.11 : एकूण बँकांच्या व्यवहाराचा विचार केल्यास ३१ डिसेंबर २0१६ पर्यंत विदर्भात सर्व बँकांमध्ये १,२३,२७१ कोटी रुपये इतक्या ठेवी होत्या आणि त्यात एकट्या नागपूरमधील बँकांमध्ये ५९ हजार ६७६ कोटी रुपये ठेवींचा समावेश आहे. अर्थात विदर्भातील एकूण ११ जिल्ह्यांपैकी एकट्या नागपुरात बँकांचे व्यवहार ५0 टक्के इतके असल्याचे प्रतिपादन दी महाराष्ट्र स्टेट को-ऑप. बँक लि.चे अध्यक्ष डॉ. एम.एल. सुखदेवे यांनी केले.

असे असतानाही विदर्भात सहकारी क्षेत्राचे जाळे वाढलेले दिसत नसल्याने त्यांनी पत्रपरिषदेत चिंता व्यक्त केली. या वेळी, बँकेचे प्रादेशिक व्यवस्थापक अरुण मुद्देश्‍वर उपस्थित होते. सहकार क्षेत्राचे मूळ विदर्भात असले तरी त्याचा पसारा मात्र विदर्भात वाढलेला दिसत नाही. त्याच अनुषंगाने विदर्भातील प्रत्येक जिल्ह्याचा अभ्यास करण्यासाठी आज नागपुरात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत बँकेने संभाव्य व्यवसाय वृद्धीकरिता धान उत्पादनावर आधारित राईस मिल सारख्या उद्योगांना कर्जपुरवठा करण्यावर लक्ष केंद्रित करण्यासोबतच, कापूस आणि मुख्य पिकांवर आधारित खासगी सुतगिरण्या व सोयाबीन, तूर पिकांवर आधारित उद्योगांना तसेच उसावर आधारित खासगी साखर कारखाने, इथेनॉल, को-जेन या उद्योगांना कर्ज पुरवठय़ाचे उद्दिष्टे ठरविण्यात आल्याचे डॉ. सुखदेवे या वेळी म्हणाले.