लोहप्रकल्पाचे कोनसरी येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

0
8

गडचिरोली, दि.११: लॉयड मेटल्सच्या बहुचर्चित लोहप्रकल्पाचे भूमिपूजन चामोर्शी तालुक्यातील कोनसरी येथे उद्या १२ मे रोजी  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा खा. अशोक नेते यांनी आज  पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेला आ. डॉ. देवराव होळी, भाजपाचे ज्येष्ठ नेते बाबूराव कोहळे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष डॉ. भारत खटी, रवींद्र ओल्लालवार, गडचिरोली पंचायत समितीचे उपसभापती विलास दशमुखे, प्रकाश अर्जूनवार आदी उपस्थित होते. खा. अशोक नेते यांनी सांगितले की, जिल्ह्यात वडसा-गडचिरोली लोहमार्गाचे नुकतेच भूमिपुजन करण्यात आले. यामुळे मोठ्या प्रमाणावर उद्योजक गडचिरोली जिल्ह्यात येऊन उद्योग सुरु करतील. याचाच भाग म्हणून सुरजागड लोहप्रकल्पाचे काम सुरु करण्यावर सरकार भर देत आहे. लॉयड मेटल्स अॅन्ड एनर्जी लिमिटेडचा लोहप्रकल्प चामोर्शी तालुक्यातील कोनसरी येथे उभारण्यात येणार असून, शुक्रवारी १२ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन व कोनशिलेचे अनावरण होणार आहे. ७०० कोटींचा हा प्रकल्प येत्या चार वर्षात हा प्रकल्प सुरू होणार असून, जिल्ह्यातील सुमारे ४ ते ५ हजार कुशल व अकुशल कामगारांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष स्वरुपात रोजगार उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पासाठी कोनसरी परिसरातील ३७ शेतकऱ्यांची ५१ हेक्टर(अंदाजे सव्वाशे एकर) जमीन संपादित करण्यात येत आहे. जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया नवीन भूमी अधिग्रहण कायद्यानुसार लवकरच पूर्ण करण्यात येणार असून शेतकऱ्यांना बाजारभावापेक्षा चारपट भाव दिला जाणार आहे. यासंदर्भातील निर्णयाची घोषणाही मुख्यमंत्री करणार असून, शेतकऱ्यांना धनादेश देणार असल्याची माहिती खा.अशोक नेते यांनी दिली.