रुक्मिणी व गोंदिया-पुणे एक्सप्रेस सुरू करण्याची मागणी

0
12

भंडारा-जिल्ह्यातील नागरिकांच्या सुविधेकरिता रेल्वे मंत्रालयाने रुक्मिणी एक्सप्रेस व गोंदिया-पुणे एक्सप्रेस या दोन नव्या गाड्या सुरू करण्याची मागणी रेल यात्री समितीच्या वतीने रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे केली आहे. भंडारा हे जिल्ह्याचे ठिकाण आहे. जिल्ह्याची लोकसंख्या १५ लाखाच्या घरात आहे. भंडारा रोड हे महत्त्वपूर्ण रेल्वेस्थानक असून, मुंबई-हावडा या लोहमार्गावरून जवळपास २५ सुपरफास्ट रेल्वेगाड्यांचे थांबे भंडारा रोड रेल्वेस्थानकावर नाहीत. बिलासपूर मंडळाने सतत भंडारा रोड रेल्वेस्थानकाची उपेक्षा केली आहे. सदर झोनची पुनर्रचना करून या स्थानकाला नागपूर विभागा अंतर्गत जोडण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. भंडारा रोड रेल्वेस्थानकावर पूर्ण शेड, फुटब्रीज, पोलिस चौकी, प्लॅटफार्म आदी सुविधांचा अभाव आहे. परिणामी प्रवाशांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागतो. नागपूर व गोंदिया या दोन मोठ्या स्टेशनमधील भंडारारोड रेल्वे स्टेशन महत्त्वाचे आहे. परंतु याची निरंतर उपेक्षा करण्यात आली आहे.
सदर स्टेशन रेल्वे बोर्डाच्या वेळापत्रकात समाविष्ट नाही. यासंबंधिचे निवेदन देऊनही दुर्लक्ष होत आहे. भंडारारोड ते भंडारा ही शटल ट्रेन सुरू करण्यासंबंधी रेल्वे बोर्डाने नेहमीच अनास्था दाखविली. जिल्ह्यातील नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने रेल्वे मंत्रालयाने गोंदिया ते गोवा व्हाया मुंबई, रत्नागिरी अशी विदर्भ कन्या रुक्मिणी एक्सप्रेस सुरू करण्याची तरतूद आगामी रेल्वे अंदाजपत्रकात करावी अशी मागणी रेल्वेमंत्र्यांना निवेदनातून रेल यात्रा सेवा समिती तर्फे करण्यात आली आहे.