संस्कारमय पिढी घडविण्यात महाविद्यालयाचे योगदान – मुख्यमंत्री फडणवीस

0
15

प्रा.राजेंद्र दोनाडकर/अनिल पु़डके
लाखनी :- ज्या काळात या परिसरात शिक्षणाची व्यवस्था नव्हती त्या काळात बापूसाहेब लाखनीकरांनी शिक्षणाचे जाळे निर्माण केले. हे महाविद्यालय केवळ महाविद्यालय नसून शिक्षणाचे मंदिर आहे. संस्कारमय पिढी घडविण्यात महाविद्यालयाचे महत्वपूर्ण योगदान असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.
आज (ता.7) लाखनी येथील राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या समर्थ महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवाचे उदघाटक म्हणून मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा. नाना पटोले होते. प्रमुख अतिथी म्हणून उर्जा मंत्री चंद्रशेखर बावणकुळे, नागपूर विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विनायकराव देशपांडे, प्र. कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर, आमदार सर्वश्री नागो गाणार, प्रा. अनिल सोले, राजेश काशीवार, चरण वाघमारे, ॲड. रामचंद्र अवसरे, संजय पुराम, अ.भा. शैक्षिक महासंघ पश्चिमांचल क्षेत्र प्रमुख प्रभूजी देशपांडे, राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आल्हाद भांडारकर व तारीक कुरेशी उपस्थित होते.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंदाचे विचार आत्मसात करावे. चांगले विचार आणि चांगले संस्कार रुजविण्यासाठी विद्यार्थ्यांनी समाज परिवर्तनाच्या ध्येयाने काम करावे. देश स्वतंत्र झाला आणि स्वराज्य मिळाले. परंतू सुशासन आणण्यासाठी देशभक्ती जागृत करणे आवश्यक आहे.
राज्यातील जनतेचा सहभाग सुराज्य निर्मितीसाठी आवश्यक असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, सुराज्य निर्मितीसाठी स्वराज्याची मुल्ये जोपासावी लागतील. पूर्ण क्षमतेने चांगली व्यवस्था निर्माण करण्यासाठी प्रत्येकाचे योगदान महत्वाचे आहे. राज्यात तरुणाईची संख्या मोठी आहे. या तरुणाईला चांगले शिक्षण आणि रोजगाराची संधी मिळाली तर महाराष्ट्र बदलू शकतो असा विश्वास मख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
शिक्षणातून स्वत:च्या पायावर उभे राहता आले पाहिजे असे मत व्यक्त करुन मुख्यमंत्री म्हणाले, केंद्र सरकारचा कौशल्य शिक्षण हा कार्यक्रम राज्य सरकार सुध्दा राज्यात राबविणार आहे. इयत्ता 9 वी पासून ते प्रत्येकाला मिळाले पाहिजे. कौशल्य प्रशिक्षणातून भविष्यात स्वयंरोजगार प्राप्त होणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हयात जास्तीत जास्त युवक-युवतींना स्वबळावर उभे राहता यावे यासाठी कौशल्य प्रशिक्षण हब तयार करु असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, युवतींना व महिलांना कौशल्य प्रशिक्षण देण्यात येईल. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत महिलांचे चांगले योगदान मिळेल. विद्यापीठाने चांगल्या महाविद्यालयांच्या पाठिशी भक्कमपणे उभे राहावे. महाविद्यालयांची अधिस्वीकृती करावी. महाविद्यालयांना स्वायतत्ता मिळाली तर त्यांच्या विकासाला चालना मिळेल. ग्रामीण भागात दर्जेदार शिक्षणाची व्यवस्था विद्यापीठाने निर्माण करावी अशी अपेक्षा व्यक्त करुन मुख्यमंत्र्यांनी जिल्हयाचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण सकारात्मक असल्याचे सांगितले.
अध्यक्षस्थानावरुन बोलतांना खा. नाना पटोले म्हणाले, जिल्हयाची विद्यानगरी म्हणून लाखनीची ओळख आहे. या संस्थेने अनेकांना घडविण्याचे काम केले आहे. जिल्हयातील शैक्षणिक मागासलेपणा दूर झाला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करुन खा. पटोले म्हणाले कौशल्य शिक्षणातून संस्कार आणि वैचारीक शिक्षण मिळाले पाहिजे. विद्यापीठाच्या माध्यमातून चांगली शिक्षण व्यवस्था निर्माण झाली पाहिजे. येणाऱ्या काळात जिल्हयाचे मागासलेपण निश्चित दूर होईल, असा विश्वास खा. पटोले यांनी व्यक्त केला.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष आल्हाद भांडारकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. सुवर्ण महोत्सव आयोजन समितीच्या वतीने मुख्यमंत्र्यांचा पुष्पहार, स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र देवून सत्कार करण्यात आला. सन्मानपत्राचे वाचन चित्रा चवळे यांनी केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय पोहरकर यांच्या धरणीकंप या काव्यसंग्रहाचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. माजी विद्यार्थी गोपीचंद नवखरे यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मानपत्र देवून सत्कार करण्यात आला.
प्रारंभी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महाविद्यालय परिसरातील भगिनी निवेदिता वसतीगृहाच्या सभागृहात लावण्यात आलेल्या विज्ञान प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी प्रदर्शनाची पाहणी करुन विद्यार्थ्यांकडून प्रयोगाबाबतची माहिती जाणून घेतली.
विद्यापीठ गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ.संजय पोहरकर यांनी केले. सुत्रसंचालन पदमजा कुलकर्णी व चित्रा चवळे यांनी केले. आभार उपप्राचार्य डॉ. राम आर्वीकर यांनी मानले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि नागरिकांची मोठया संख्येने उपस्थिती होती.