इन्फोसिसला ३,२५० कोटी रुपयांचा नफा

0
6

बंगलोर- देशातील दुस-या क्रमांकाची माहिती-तंत्रज्ञान कंपनी इन्फोसिसने अंदाज चुकवत अनपेक्षित चांगली कामगिरी केली. ३१ डिसेंबरला संपलेल्या तिस-या तिमाहीत कंपनीने ३,२५० कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत नफ्यात १३ टक्क्यांची वाढ झाली असून उत्तर अमेरिकेतील व्यवसायवाढ आणि नव्या ग्राहकांनी यात मोठा वाटा उचलला आहे. भारतातून कंपनीच्या महसुली कामगिरीला चांगला हातभार लागला.
३१ डिसेंबरला संपलेल्या तिमाहीत या कंपनीने १३,७९६ कोटी रुपयांचा महसूल मिळवला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यामध्ये ५.९ टक्के वाढ झाली असून या आर्थिक वर्षाचा महसुलाचा अंदाज कायम ठेवला आहे. यामुळे शेअर बाजारातही कंपनीच्या शेअरला मोठा फायदा झाला. हा शेअर ५ टक्क्यांच्या वाढीसह २,०७३.६० रुपयांवर झेपावला. याचा एकूणच बाजारावरही चांगला परिणाम झाला. तिमाहीगणिक इन्फोसिच्या महसुलामध्ये ३.४ टक्के वाढ झाली. सॉफ्टवेअर उत्पादनांवर अधिक लक्ष केंद्रित करतानाच आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, इंटरनेट ऑफ थिंग्ज यांसारख्या नव्या जमान्यातील उपाययोजनही आणल्या आहेत.
कंपनीच्या कामगिरीबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल सिक्का यांनी नेमकी आणि बोलकी प्रतिक्रिया दिली. तिस-या तिमाहीत अनेक अशा बाबी आहेत, ज्या आमचा उत्साह दुणावणा-या आहेत. नवीन धोरणाचे आमच्या ग्राहकांकडून चांगल्या प्रकारे स्वागत झाले असून अपेक्षेपेक्षा लवकर हे धोरण यशस्वी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
इन्फोसिसच्या डॉलरमधील नफ्यात १२.७ टक्के वाढ होऊन ५२.२ कोटी डॉलरवर गेला आहे. तर ५.६ टक्क्यांच्या वाढीसह महसूल २.२१ अब्ज डॉलरवर गेला आहे. अँजेल ब्रोकिंगचे सरबजित कौर नांगरा यांनी तिस-या तिमाहीमध्ये अपेक्षेपेक्षा चांगला नफा इन्फोसिसला झाल्याचे म्हटले आहे. दरम्यान, तिमाहीगणिक महसुलात झालेली ०.८ टक्के वाढ ही अपेक्षेनुसारच असल्याचे म्हटले आहे. या तिमाहीमध्ये मोठया प्रमाणावर व्यवसाय वाढला.
याबरोबरच वापरातील वाढ आणि मोठया प्रमाणावर ग्राहक जोडल्याचे इन्फोसिसचे सीओओ यू.बी. प्रवीण यांनी सांगितले. तिस-या तिमाहीत कंपनीने ४,२२७ लोकांना नव्याने सेवेत सामावून घेतले असून यासह कर्मचा-यांची संख्या १,६९,६३८वर गेली आहे. इन्फोसिस आणि तिच्या उपकंपन्यांनी एकूण ५९ नवे ग्राहक जोडले. या तिमाहीत कंपनीने या वर्षासाठी २५४ कोटी रुपये ‘सीएसआर’अंतर्गत राखीव ठेवले आहेत. विश्लेषकांनी इन्फोसिसची कामगिरी ही अपेक्षेपेक्षा चांगली असल्याची पोचपावती दिली आहे.
कर्मचारी गळती थोपवण्यासाठी बोनस
कर्मचा-यांची मोठया प्रमाणावरील गळती थोपवण्यासाठी इन्फोसिसने डिसेंबर तिमाहीसाठी १०० टक्के बोनसची घोषणा केली आहे. गेल्या काही तिमाहींमध्येही अशा प्रकारच्या अन्य उपाययोजन करण्यात आल्या असून त्याचा सकारात्मक परिणाम दिसल्याचे इन्फोसिसचे मुख्य व्यवसाय अधिकारी यू.बी. प्रवीण यांनी सांगितले. इन्फोसिसच्या वरिष्ठ व्यवस्थापनाला मोठी गळतीने गेल्या काही वर्षापासून हैराण केले असून विशाल सिक्का यांच्यासमोर हे सर्वात मोठे आव्हान आहे.
इनोव्हेशन फंडामध्ये पाचपट वाढ
देशातील दुस-या क्रमांकाच्या या माहिती-तंत्रज्ञान कंपनीने आपला ‘इनोव्हेशन फंड’ पाचपट वाढवून ५० कोटी डॉलरवर नेला आहे. स्टार्ट-अप कंपन्या आणि आर्टिफिशिअल इंटेलिजन्ससारख्या नव्या दमाच्या तंत्रज्ञानाला चाला देण्यासाठी हा फंड वापरला जाणार आहे. हा फंड १० कोटी डॉलरवरून ५० कोटी डॉलपर्यंत वाढवण्यासाठी संचालक मंडळाने दिलेल्या मंजुरीने नवा उत्साह संचारला असून यातील काही भाग भारतात गुंतवला जाईल, असे कंपनीचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक विशाल सिक्का यांनी सांगितले. हा फंड कुठे वापरणार याबाबत येत्या तीन महिन्यांत जाहीर केले जाणार आहे.