संजय दत्त तुरुंगात जाणार, फर्लोनचा अर्ज फेटाळला

0
7

मुंबई – बॉलिवूड अभिनेता संजय दत्तने फर्लोनची रजा वाढवून मिळावी यासाठी केलेला अर्ज शनिवारी तुरुंग प्रशासनाने फेटाळून लावला. संजय दत्तला येरवडा कारागृहात हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात शुक्रवारी दिलेल्या आश्वासनानंतर शनिवारी संजय दत्तचा वाढीव रजेसाठीचा फर्लोनचा अर्ज नामंजूर करण्यात आला. कायदा सर्वांसाठी समान असून, आपले सरकार कायद्याचे पालन करील. कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये कोणताही भेदभाव करणार नाही किंवा कोणा एकालाच लक्ष्य करणार नाही असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते.
मुंबई १९९३ बॉम्बस्फोट खटल्यात बेकायदा शस्त्रास्त्र बाळगल्या प्रकरणी पाचवर्ष तुरुंगवासाची शिक्षा भोगणा-या संजय दत्तला वारंवार मिळणा-य़ा सुट्टीमुळे सर्वसामान्य जनता आणि येरवडा कारागृहातील कैद्यांमध्ये संतापाची भावना आहे. संजय दत्त २४ डिसेंबरपासून फर्लोनच्या रजेवर बाहेर होता.
शुक्रवारी चौदा दिवसांच्या संचित रजेनंतर येरवडा कारागृहात जाण्यासाठी निघालेला अभिनेता संजय दत्त कारागृहात न जाता पुन्हा मुंबईत दाखल झाला. रजेचा अर्ज प्रलंबित असल्याचे कारण देऊन तो पुन्हा मुंबईला परतला होता. मे २०१३ ते मे २०१४ मध्ये संजय दत्तला वारंवार मिळालेल्या सुट्टीची चौकशी करण्याचे आदेश महाराष्ट्र सरकारने दिले आहेत.