२९ विद्यार्थ्यांना विषबाधा

0
17

गोरेगाव : जवळच्या हिरडामाली येथील जिल्हा परिषद शाळेतील वर्ग ३ ते ७ मधील विद्यार्थ्यांनी चंद्रज्योतीच्या बिया खाल्ल्याने २९ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. त्यांच्यावर गोरेगावच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. गुरुवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

प्राप्त माहितीनुसार, हिरडामाली येथील वरिष्ठ प्राथमिक शाळेतील वर्ग ३ ते ७ मधील विद्यार्थ्यांनी दुपारच्या सुटीत शाळेजवळ असलेल्या झाडांच्या चंद्रज्योतीच्या बिया खाल्ल्या. त्यानंतर काही विद्यार्थ्यांना उलट्या होणे सुरू झाले. हा प्रकार एका शिक्षकाच्या लक्षात आल्यावर त्यांनी विद्यार्थ्यांना विचारपूस केली असता विद्यार्थ्यांना चंद्रज्योतीच्या बिया खाल्ल्याचे लक्षात आले. या प्रकाराचे गांभिर्य ओळखून लगेच शाळेतून १०८ या क्रमांकावर फोन करून गोरेगावच्या ग्रामीण रुग्णालयातून रुग्णवाहिका बोलविण्यात आली. त्यानंतर २९ विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

त्या सर्व विद्यार्थ्यांवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उलट्यांमुळे त्यांच्यात कमालीचा अशक्तपणा आला आहे. त्यांना सलाईन लावण्यात आले असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ.पी.के.पटले यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)

५०० फुटावर होते झाड

चंद्रज्योतीच्या बिया खाण्यासाठी गोड लागतात. मात्र त्या विषारी असतात. हिरडामालीतील प्राथमिक शाळेपासून ५०० फुटावर चंद्रज्योतीचे झाड आहे. दुपारच्या सुटीत विद्यार्थी त्या ठिकाणी गेले होते. मोठ्या मुलांचे पाहून लहान मुलांनीही त्या बिया खाल्ल्या. मात्र त्यानंतर त्यांना गरगरायला लागले.