पैशाच्या वादातून नांदेडमध्ये माजी जि.प. सदस्याचा खून

0
7

नांदेड,दि.27 –जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व दलित महासंघाचे नेते दिनकर शेवाळे यांची व्याजाने घेतलेल्या पैशाच्या वादातून दोघांनी घरात घुसून हत्या केली. मंगळवारी सकाळी निळा रोडवरील देशमुख कॉलनीत ही घटना घडली. हल्लेखोरांनी शेवाळे यांच्यावर तीक्ष्ण शस्त्राचे ४० वार केले. दरम्यान, दोन्ही आरोपी पोलिस ठाण्यात हजर झाले.डॉ. अविनाश शिंदे व सखाराम कुंभेकर हे दोघे सकाळी ७ वाजता शेवाळेंच्या घरी गेले. त्यांनी घरात घुसून आतून दार लावले. शेवाळेंवर शस्त्राने ४० वार केले. किंकाळ्या ऐकून वॉचमनच्या पत्नीने खोलीकडे धाव घेतली. मात्र, तोपर्यंत शेवाळेंचा मृत्यू झाला होता. शेवाळे हे २०११ मध्ये जि.प.च्या मांजरम गटातून भाजपच्या तिकिटावर जिंकले होते.शेवाळे यांनी डॉ. अविनाश शिंदेकडून ५० लाख रुपये घेतले होते. हे पैसे शेवाळे परत देत नव्हते. या कारणावरून यापूर्वी शेवाळे व शिंदे यांच्यात वादही झाला होता. काटा काढायचा असे ठरवूनच डॉ. शिंदे याने शेवाळेंना संपवले. या प्रकरणातील आरोपी डॉ. शिंदे व कुंभकर्ण यांना अटक केल्याचे पोलिस उपअधीक्षक अर्चना पाटील यांनी सांगितले.