नांदेड,दि. 29ःनांदेड जिल्ह्यातील जाणापुरी येथील शहीद संभाजी कदम यांच्या मुलीला ज्ञानमाता हायस्कूलच्या मुख्याध्यापकाने प्रवेश नाकारून शाळेत प्रवेश देण्यास मनाई केली आहे,वीर पत्नी शितल कदम यांना मानहानीकारक, अपमानास्पद वागणूक देणाऱ्या शाळेच्या विरोधात प्रशासनाने कारवाई करून शाळेची मान्यता तात्काळ रद्द करून शाळेचे संचालक व मुख्याध्यापक यांच्या विरोधात गुन्हे दाखल करावे अन्यथा मुजोर शाळेविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेच्या वतीने प्रदेश कार्याध्यक्ष भागवत देवसरकर यांनी दिला आहे.
याबाबत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख, पालकमंत्री अशोकराव चव्हाण,शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांनी या प्रकरणात तात्काळ लक्ष घालून शाळेविरोधात तीव्र कारवाई करावी,जनसामन्यात जी संतापाची लाट पसरली आहे ती कमी करावी अशी मागणी त्यांच्या कडे कृषी परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे.
जानापुरी ता.लोहा येथील शहीद संभाजी कदम यांच्या पत्नी शीतल कदम मागील वर्षापासून ज्ञानमाता विद्यालयांमध्ये आपल्या मुलीला प्रवेश मिळावा याकरता खेटे मारत होत्या,गेल्या वर्षभरापासून शाळेने मुलीला प्रवेश दिलाच नाही,उलट शहीद संभाजी कदम यांच्या पत्नी शीतल कदम यांना याबाबत अपमानास्पद वागणूक दिली गेली आहे, याबाबत स्थानिक वृत्तपत्र व सोशल मीडियात ही बातमी येताच जनतेमध्ये ज्ञानमाता विद्यालयच्या विरोधात संतापाची लाट पसरली असून याबाबत राज्य सरकारने तात्काळ दखल घेऊन शाळे विरोधात गुन्हे दाखल करावेत व शाळेची मान्यता रद्द करावी अशी मागणी राज्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांच्याकडे पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेने केली आहे. अन्यथा या मुजोर शाळेच्या विरोधामध्ये पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद प्रशासनाने घ्यावी असा इशारा प्रदेश कार्याध्यक्ष भागवत देवसरकर, ज्ञानोबा गायकवाड पांडुरंग पोपळे,मोतीराम पवार,मंगेश गवळी,शेख रहीम यांच्यासह अनेकानी दिला आहे.




