गडचिरोली,दि.२९: जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील लाहेरी उपपोलीस ठाण्यांतर्गत पेरमिलभट्टी जंगलात आज बुधवारला(दि.29) सकाळी पोलीस व नक्षल्यांमध्ये चकमक उडाली. या चकमकीनंतर पोलिसांनी ५ नक्षल्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून ३ बंदुका व अन्य साहित्यही ताब्यात घेतले आहे.पोलीस अधिक्षक शैलेष बलकवडे यांनी या कारवाईतील सहभागी पोलीस व सी 60 चमूचे अभिनंदन केले आहे.पेरमिलभट्टीचे जंगल हे छत्तीसगड राज्यातील घनदाट अबुजमाड जंगल परिसराला लागून आहे. या परिसरात आज सी-६० पथकाचे जवान नक्षलविरोधी अभियान राबवीत असताना नक्षलवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनी प्रत्युत्तर देताच नक्षलवादी जंगलातून पळून जात होते. मात्र, पोलिसांनी पाठलाग करुन ५ जहाल नक्षलवाद्यांना पकडण्यात यश मिळविले. त्यांच्याकडून ३ शस्त्रे व अन्य साहित्यही ताब्यात घेण्यात आले आहे. रैनू सोनू वड्डे (२०) बंडू चक्कू वड्डे (२५) (दोघेही रा.पदमकोट, छत्तीसगड ), सुखराम सोमा उसेंडी(४०), दोगे इरपा उसेडी(३०) (दोघेही रा. उसेवाडा, छत्तीसगड) व केये सायबी वड्डे( ४०) रा.पदमकोट, छत्तीसगड अशी अटक् केलेल्या नक्षल्यांची नावे आहेत. यातील दोन जण् एरिया दलम सदस्य, तर तिघे जनमिलीशियात कार्यरत आहेत. त्यांच्यावर लाहेरी उपपोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.





