तुमसरच्या तरूणाने ५३ तासांत बनवला चित्रपट, मिळाला २.२५ लाखांचा पुरस्कार

0
37

तुमसर(भंडारा)- भंडारा जिल्ह्यातील तुमसर निवासी मृगांक शशिकुमार वर्मा या तरुणाने ५३ तासांत शॉर्ट फिल्म तयार करुन आपले नाव जागतिक पातळीवर कोरले आहे.नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (एनएफडीसी) आणि केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय यांनी शॉर्ट्स टीव्हीच्या सहकार्याने गोवा येथे आयोजित केलेल्या या स्पर्धेत ‘इंडिया@१००’ या संकल्पनेवर ५३ तासांत शॉर्ट फिल्म बनविण्याचे आव्हान होते.हा चित्रपट तयार करुन 2.25 लाखाचा पुरस्कार पटकावला आहे. ५३ तासांच्या चॅलेंज दरम्यान लघुपट तयार करण्यासाठी ७५ स्पर्धकांना ५ संघांमध्ये विभागण्यात आले होते.इफ्फी २०२२ च्या या ‘सेगमेंट’ अंतर्गत ५ संघांनी ५३ तासांत वेगवेगळ्या विषयांवर ५ लघुपटांची निर्मिती केली, ज्यांचे परीक्षण चित्रपट निर्माते मणिरत्नम, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे उपसचिव (फिल्म्स) आर्मस्ट्राँग पाल्म आणि शॉर्ट्स टीव्हीचे सीईओ आणि संस्थापक कार्टर पिल्चर यांच्या तीन सदस्यीय ज्युरी पॅनेलने केले. यामध्ये पर्पल टीमचा तुमसर येथील तरुण मृगांक वर्मा यांनी संपादित केलेला ‘डियर डायरी’ हा लघु चित्रपट विजेता ठरला. विजयी संघाला २ लाख २५ हजार रुपयांचा धनादेश ज्युरी पॅनलच्या वतीने प्रदान करण्यात आला. सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते पद्मश्री मणिरत्नम यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले. विशेष म्हणजे, सर्व ५ लघुपटांचा प्रीमियर २७ नोव्हेंबर रोजी भारत, अमेरिका, युरोप आणि लॅटिन अमेरिकेत शॉर्ट्स टीव्हीवर झाला. ही स्पर्धा जिंकून गोव्याहून तुमसरला परतलेल्या मृगांकच्या कुटुंबात उत्सवाचे वातावरण आहे.
५३ तासात चित्रपट बनवणे हे एक मोठे आव्हान होते, जे पाचही टीमने पूर्ण केले. चित्रपट निर्मितीसाठी लोकेशन आणि छायाचित्रणासह संकलनापर्यंतची सर्व आवश्यक संसाधने ‘एनएफडीसी’ने आम्हाला उपलब्ध करून दिली होती. सर्व सहकाऱ्यांनी रात्रंदिवस मेहनत करून आव्हान पूर्ण केले. आमचा चित्रपट सर्वोत्कृष्ट ठरला. संपादक म्हणून ‘डियर डायरी’चा भाग होणे ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.-मृगांक शशिकुमार वर्मा, तुमसर