निवडणूक आयोग बरखास्त करा:उद्धव ठाकरे यांची मागणी

0
21

मुंबई-निवडणूक आयोग बरखास्त करा. निवडणूक घेऊन निवडणूक आयुक्तांची निवड करावी, अशी मागणी सोमवारी उद्धव ठाकरे यांनी केली. निवडणूक आयोगाला निर्णय आमच्याविरोधात द्यायचा होता, तर शपथपत्रे का भरून घेतली, असा सवालही त्यांनी केला. निवडणूक आयोग म्हणजे सुलतान नाही, अशी तिखट टीका त्यांनी केली. तर देशात चोरांना राजप्रतिष्ठा देण्याचा काळ सुरू असल्याचे म्हणतच भाजपने दगा दिला असेही त्यांनी म्हटले आहे.

देशात चोरांना राजप्रतिष्ठा देण्याचा काळ सुरू आहे, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला लगावला आहे. पक्षाचे नाव आणि चिन्ह चोरणे हा संपूर्ण पूर्वनियोजित कट होता. जर आता आपण काही केले नाही तर 2024 ची निवडणूक ही लोकशाहीची शेवटची निवडणूक असेल असे ठाकरेंनी म्हटले आहे. ज्या निवडणूक आयुक्तांनी हा निर्णय दिला त्या तिघांमधील एका आयुक्तांची नेमणूक करण्यात आली आहे, तेच वादग्रस्त असल्याचेही उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.

उद्धव ठाकरे काय म्हणाले

उद्धव ठाकरे म्हणाले की, केंद्र सरकारच्या मदतीने त्यांना पक्ष आणि चिन्ह मिळू शकले. मात्र, त्यांना ठाकरे नाव मिळणार नाही, ते चोरू शकणार नाही असे त्यांनी म्हटले आहे. तर आता जर आवाज उठवला नाही तर येणाऱ्या काळात देशातील इतर पक्षांसोबत देखील हे होऊ शकते असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय अपेक्षित नव्हते, त्यांनी दिलेला निकाल अयोग्य आहे. आम्ही सुप्रीम कोर्टात या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. घटनेनुसार बाहेर गेलेले सर्व आमदार अपात्र ठरवायला हवे होते. मात्र, केवळ गुंता वाढावा म्हणून निवडणूक आयोगाने घाईत हा निर्णय घेतल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केला आहे.

उद्धव ठाकरे यापुढे म्हणाले की, शिंदे गटात लोक एकत्र बाहेर पडले नाही, सुरूवातील 16 आमदार बाहेर पडले, त्यावर आम्ही अपात्रतेची कारवाई संदर्भात तक्रार केली, यावर सुप्रीम कोर्टात् गेलो आहोत, त्यावर आधी निर्णय व्हायला हवा तर निवडणूक आयोगाविरोधात आम्ही कोर्टात गेलो असून तिथे दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल् असा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला आहे.

2024 नंतर देशात हुकूमशाही येईल

उद्धव ठाकरे म्हणाले की, घटनेनुसार तर 40 आमदार अपात्र ठरले पाहिजे, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. निवडणूक आयोग बरखास्त करावा आणि लोकशाही मार्गाने निवडणूक आयोगांच्या आयुक्तांची निवड केली जावी असेही ठाकरेंनी म्हटले आहे. तर मला शरद पवार, ममता बॅनर्जी आणि नितीश कुमार यांच्यासह फोनवरून चर्चा झाली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पक्षाच्या निधीवर डल्ला मारण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाही असे सांगतानाच 2024 नंतर देशात हुकुमशाही येईल असा दावाही त्यांनी केला आहे.

घरातील लोकांनी घात केला

शिंदेंच्या शिवसेनेचा व्हीप आम्हाला लागू होणार नाही, कारण त्यांना वेगळा गट आणि आम्हाला वेगळा गट म्हणून मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर त्यांना पक्षाचे नाव आणि चिन्ह मिळाले आहे. पालिकेतील कार्यालय शिंदेंच्या गटाला देणे हे गुन्हा ठरेल, कारण मनपात सध्या प्रशासक आहे. आमचे हत्यारे हे घरातीलच निघाले, असे म्हणतच त्यांनी शिवसैनिकांना भावनिक साद घातली आहे. तर शिवधनुष्य हे शिंदे गटाला पेलणार नाही, लोकांना हे पटलेले नाही, मी राज्यभर सभा घेणार असल्याचे सांगतानाच एकनाथ शिंदेंनी माझ्या वडिलांचे नाव न वापरता आपल्या वडिलांचे नाव वापरण्याचे आव्हान उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिले आहे.